वडूज: ‘देशाला विकणाऱ्या सरकारचा धिक्कार करून ते रोखण्याचे काम सध्या काँग्रेस करीत आहे. ‘अंबानी-अदानी’ या खासगी क्षेत्रातील लोकांना सरकारी संस्था विकण्याचे काम ईस्ट-इंडिया कंपनीप्रमाणे मोदी सरकार करीत आहे,’ अशी टीका काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.
वडूज येथील हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, उल्हास पवार, सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, गुलाबराव घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर आदी उपस्थित होते.
एच. के. पाटील म्हणाले, ‘पत्रकारांनी वास्तव भूमिका मांडल्यामुळेच मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. मोदी सरकारने देशाला खिळखिळे केले असल्याने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारप्रमाणे काम करणार. सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील हुतात्म्यांच्या भूमीत येऊन त्यांना अभिवादन करण्याचे भाग्य लाभले.’
नाना पटोले म्हणाले, ‘केंद्रातील जुलमी मोदी सरकार खोटं स्वप्न दाखवून सत्ता घेतली. महत्त्वाच्या सरकारी संस्था विकून सात वर्षे देश लुटण्याचे काम भाजपने केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा यांना विसर पडला असून, अपमानित करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. देशाला लुटून विकणाऱ्या मोदी सरकारने भारतीय रेल्वेला ‘अदानी रेल्वे’ करण्याचे पाप केले आहे.’
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, वडूज ही क्रांतिकारकांची भूमी असून, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, दादासाहेब उंडाळकर आदींच्या योगदानामुळे देशात क्रांतिकारकांची प्रेरणाज्योत तेवत ठेवली जात आहे. केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. देशावरील ५५ हजार कोटी रुपये कर्ज एक लाख दहा हजार कोटीपर्यंत पोहोचले आहे. जुलमी सरकार विरोधात जर बोलाल तर इडीची चौकशी लावली जाते.’
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘जालीयनवाला बाग हत्याकांडनंतर देशात दुसरीकडे एकाचवेळी नऊ हौतात्म्य पत्करणारी हुतात्मा नगरी म्हणून वडूजला संबोधले जाते. घटनात्मक संस्थांचा गळा घोटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. हेरगिरी प्रकरणासाठीचे वापरलेले सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या नागरिकत्वाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. आपले संविधान वाचविण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आल्याचे त्यांनी सुचित केले.’
रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्या नऊ हुतात्म्यांचे स्मरण सदैव तेवत ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे. या हुतात्म्यांना प्रतिवर्षी ९ सप्टेंबरला अभिवादन करण्याचीही परंपरा माजी आमदार केशवराव पाटील व विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी अविरतपणे सुरू ठेवली होती.’
यावेळी यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदम, विनायक देशमुख, बसवराज पाटील आदींची भाषणे झाली. याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव गोडसे, ॲड. विजयराव कणसे, डॉ. महेश गुरव, डाॅ. विवेक देशमुख, बाबासाहेब माने, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, रजनी पवार, शिवराज मोरे, डाॅ. संतोष गोडसे आदींसह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ०९वडूज ०१
वडगाव ते वडूज हुतात्मा स्मरण यात्रा ज्योतीचे स्वागत करताना एच. के. पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)