सातारा : ‘देशाची आर्थिक स्थिती ढासळलीय. पंतप्रधानांनी विकासाचे आकडे फुगवलेत. अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण ढासळल्याने मोदींनी अर्थमंत्र्यांना बाजूला सारून सारी सूत्रे हाती घेतलीत. अर्थव्यवस्थेचं खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर फोडायचा प्रयत्न आहे. गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी निर्माण करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही,’ अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तोफ डागली.
सातारा येथे काँग्रेस कमिटीमध्ये पक्षाच्या तालुकानिहाय बैठका घेण्यासाठी चव्हाण आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मागील पाच वर्षांत भाजप आणि मुख्यमंत्री असणाºया फडणवीस यांनी आपल्या पदाचा वापर करून बेरोजगारी वाढविली. तसेच त्यांच्याच काळात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली. औद्योगिकमध्ये एक नंबरवर असणारे राज्य मागे पडले. सतत घोषणाबाजीत असणाºयांमुळे राज्यात एकही मोठा पायाभूत प्रकल्प आलेला नाही. असे हे सरकार येऊ नये, असे वाटत होते. त्यामुळेच आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी सत्ता आणि पैशाचा गैरवापर केला.
केंद्र शासनाने नागरिकत्वाचा कायदा आणला आहे. मोदींनी बदल करून देशाच्या संविधानावरच हल्ला केलाय. महिला, मुले, शेतकरी, अल्पसंख्यांक रस्त्यावर उतरलेत, असे सांगून चव्हाण म्हणाले, ‘देशात विस्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर भारताची लोकशाही धोक्यात आली आहे,’ असं वाटू लागलंय. केंद्राने हा कायदा मागे घ्यावा. नाहीतर आताचे वातावरण आणखी पेटत जाईल.’
देशाचं अंदाजपत्रक मांडताना अर्थमंत्री विविध घटकांशी चर्चा करतात. ही देशातील परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बैठका घेतल्या. आतापर्यंत १३ बैठका झाल्या असाव्यात. एका बैठकीला अर्थमंत्रीच नव्हत्या. याचा अर्थ दोघांचाही अर्थमंत्र्यावर विश्वास नव्हता का?. हा ऐका महिलेचा अपमान आहे, असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.
- नवीन पदाधिकारी नेमणार; पत्रकारांना बाहेर काढणं योग्य नव्हतं...
पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विविध प्रश्न केले. यावेळी त्यांनी जिल्'ात नवीन पदाधिकारी नेमणार आहे. त्यासाठीच ही आढावा बैठक घेतली, असे सांगितले. तसेच साताºयात महाविकास आघाडीचा प्रयोग होणार का? या प्रश्नावर त्यांनी ‘प्रयत्न सुरू आहेत,’ असे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील काहीजण भाजपात गेलेत. ते संपर्कात आहेत का? असा प्रश्न केल्यावर, ‘संपर्कात कोणी नाही. वाई, फलटण, क-हाडवाल्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. पण वाईट वाटून घेऊन काय करणार? वास्तव आहे, ते स्वीकारावं लागतं,’ असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
- जिल्हा नियोजन समिती बैठकीला पालकमंत्र्यांनी पत्रकारांना मज्जाव केल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर चव्हाण यांनी ‘हे योग्य नाही. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. असे झाले तर शासकीय पे्रसनोटवर तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. तुमचं विश्लेषण येणार नाही,’ असं सांगत एकप्रकारे पत्रकारांची बाजूच त्यांनी घेतली.