सातारा : ‘दिल्ली जळत असतान ट्रम्प यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग्न झाले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जबाबदारी पाळलेली नाही. देशाची प्रतिमा धुळीला मिळविण्याचे काम या जोडगोळीने केले आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
येथील काँगे्रस कमिटीमध्ये शनिवारी आयोजित कार्यकर्ता मेळावा व नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे, !एनएसयूआय’राष्ट्रीयचे सरचिटणीस शिवराज मोरे, सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, अजित पाटील-चिखलीकर, साहेबराव जाधव, प्रदेश प्रतिनिधी रजनी पवार, बाबूराव शिंदे, अविनाश फाळके, जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक उपस्थित होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे ठराविक अधिकार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा अधिकार त्या मुख्यमंत्र्यांना नाही. ही संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. दिल्लीमध्ये शांतता राखण्यात अमित शहा यांना पूर्णत: अपयश आलेले आहे. गुजरात राज्यातील २००२ मध्ये झालेल्या दंगलीवरून तत्कालीन मुख्यमंत्री मोदी, गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर अठरा वर्षे झाली तरी प्रश्न चिन्ह आहे. हीच जोडगोळी केंद्रात कार्यरत आहे. दिल्लीमध्ये नाहक ४२ जणांचा बळी गेला. विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे काम भाजप करत आहे. निवडणुकांमध्ये एका मागून एक पराभव होत असताना राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्देशाने नागरिकत्व कायदा आणला जात आहे. सीएए कायदा हा दोषपूर्ण असा असून, सर्व जाती यात पोळल्या जाणार असल्याने काँगे्रसने कायद्याला तीव्र विरोध केलेला आहे.’
मोदी सरकारमुळं भविष्य अंधारातदेशाची आर्थिक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. बेरोजगारी, महागाईने डोके वर काढलेले आहे. जीएसटी योग्य पद्धतीने गोळा होत नाही. केंद्राकडून राज्याला देण्यात येणारा कराचा वाटाही वेळेत दिला जात नाही. भाजप सरकारचं पितळ आता पूर्णत: उघडे पडले असून, युवकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या परिस्थितीत काँगे्रसला ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असे भाष्यही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.
- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आत्तापासूनच बांधणी करणे आवश्यक आहे. युवक काँगे्रसच्यावतीने जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याची तयारी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, त्या ३० गटांचा रोड मॅप तयार केला असल्याची माहिती युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी यावेळी दिली.
- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व आमदार जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय किरण बर्गे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर अजित पाटील-चिखलीकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश फाळके हे दोघे व्यासपीठावरून खाली उतरले. चिखलीकर आणि फाळके यांनी आपल्या कृतीतून बर्गे यांच्याविषयीची नाराजी व्यक्त केल्याची कुजबूज उपस्थितांमधून सुरू होती.