सातारा : येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या समर्थनगर येथे एक वयोवृद्ध महिला राहत्या घराच्या गार्डनमध्ये गवत काढत असताना तिच्या मुलांची ओळख सांगून तिचा विश्वास संपादन करीत तिच्याकडील दोन तोळ्याची दुपदरी मोहनमाळ चोरून नेल्याची घटना रविवार, दि. २० रोजी घडली. याप्रकरणी दोन अनोळखींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजाबाई शिवशंकर शिराळ (वय ७९, रा. निशिगंधा कॉलनी, समर्थनगर, एमआयडीसी, सातारा) या रविवार, दि. २० रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या गार्डनमध्ये गवत काढत होत्या. यावेळी त्यांच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आल्या, त्यांनी त्यांच्या मुलांची ओळख सांगितली. यावेळी दोन अज्ञातांनी राजाबाई यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची दुपदरी मोहनमाळ चोरून नेली.
दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच राजाबाई यांनी मंगळवार, दि. २२ रोजी याची सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे तपास करीत आहेत.