पळशी : मोही गावात शासनाकडून लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या चार वर्षांपासून पूर्ण काम होऊनही कुलूपबंद आहे. वारंवार संबंधित विभागाकडे हे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी करूनही आजपर्यंत हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत धूळ खात आहे.
याबाबतचे लेखी निवेदन मोही सरपंचांनी ग्रामस्थांच्यावतीने माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दिले आहे.
मोही (ता. माण) येथे कोरोना संसर्ग रोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बाहेर गावी रुग्णालयात बेड व वैद्यकीय उपचार वेळेत मिळत नाहीत, तसेच कोरोना रुग्णांना वेळेत हॉस्पिटलला पोहोचण्यासाठीही वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मोही गावात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, गेल्या दहा दिवसांपासून मोही गाव बंद करण्यात आले आहे. तर गावातच उपकेंद्र असूनही ज्येष्ठ नागरिकांना शिंगणापूर व मार्डी येथे कोरोनाच्या लसीकरणासाठी जावे लागत आहे. हे उपकेंद्र सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिकांची सोय होऊन वेळ वाचेल.
तसेच वेळ व पैसा खर्च करूनही रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने मोहीमध्ये नुकताच एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र त्वरित सुरू करून येथे कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
कोट..
पूर्ण काम होऊनही चार वर्षांपासून उपकेंद्र पडून आहे. हे उपकेंद्र सुरू करून मोही ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी व येथे कोरोना सेंटर सुरू करावे.
- देवराज कदम, ग्रामस्थ, मोही
२२मोही
मोही (ता. माण) येथील उपकेंद्र पूर्ण काम होऊनही चार वर्षांपासून धूळ खात पडून आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत.