पळशी : माण तालुक्यातील मोही येथे मागील महिन्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दररोज चार-दोन रुग्ण वाढत होते. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत होती. गाव परिसरासह वाड्या-वस्त्यांवरही रुग्ण आढळून येत होते. महिनाभरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली होती. त्यामुळे गावात कमालीची भीती पसरली होती; पण योग्य उपाययोजना व नियमांचे काटेकोर पालन करून मोही ग्रामस्थांनी कोरोनाची वाढती साखळी तोडण्यात यश मिळविले आहे. आज गावात रुग्णसंख्या एकशेएकवरून अवघी तीनवर आली आहे.
मागील महिन्यात गावात रुग्णसंख्या एकशे एक झाल्याने गावात कमालीची सामसूम होती, तर खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वेगळी होती. त्यामुळे मोही गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक जण गाव सोडून शेतात राहायला गेले. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासनापुढे गंभीर प्रश्न उभा राहिला होता. रुग्णसंख्या घटत नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने तत्काळ आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली व दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीने गावात कोरोना चाचणी घेण्याचे कॅम्प भरविले. त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ विलगीकरणात ठेवण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांच्याही टेस्ट करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखला गेला. गाव परिसरात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला व संशयित रुग्णांवर त्वरित उपचार करण्यात आला. याबरोबरच ग्रामपंचायतीने गावातील खासगी दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क करून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन थेट संबंधित रुग्णांशी संपर्क केला व आवश्यकतेनुसार त्यांना आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यामुळे आज मोही गावात एकशे एकवरून रुग्णसंख्या अवघी तीनवर आली असून, मोही गावच्या एकीची व एकूणच कार्यपद्धतीची सर्वत्र चर्चा होत आहे.
(चाैकट)
विनाकरण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल
लॉकडाऊन करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने गाव परिसर, तसेच वाड्या-वस्त्यांवर लाऊडस्पीकरद्वारे कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करीत लॉकडाऊनची कल्पना दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी आवश्यक किराणा घरी आणून ठेवला. बंद काळात फक्त दवाखाने, मेडिकल वगळता सर्व व्यवहार काटेकोरपणे बंद ठेवण्यात आले होते. विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. त्यातच शासनाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने गावात सलग पंचवीस दिवसांचा लॉकडाऊन झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास आणखी मदत झाली.
१९ पळशीमोही (ता. माण) येथे काटेकोरपणे बंद पाळण्यात आल्याने रुग्णसंख्या एकशे एकवरून अवघी तीनवर आली. (शरद देवकुळे).