लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एका युवतीला मोबाईलवरून कॉल करून तुझ्याशी मला लग्न करायचे असे म्हणून युवतीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या एका परप्रांतियावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अजय विश्वनाथ यादव (रा. एमआयडीसी, सातारा, मूळ रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या परप्रांतीय युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार पीडित युवतीला अजय यादव याने मोबाईलवर वारंवार कॉल करून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगितले. मात्र, युवतीची इच्छा नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने युवतीचा सातत्याने पाठलाग करून त्रास देणे सुरू केले. तो तिच्या अपार्टमेंटभोवतीही घिरट्या घालून तिला त्रास देत होता.
दि. १२ एप्रिल रोजी युवती एका मेडिकलमध्ये औषधे घेत असताना अजय यादव तिथे आला. त्याने पुन्हा त्या युवतीला तुझ्याशी मला लग्न करायचे आहे. तू जर लग्न केले नाहीस तर मी तुझा असाच पाठलाग करत पाठीमागे येत राहीन, असे म्हणू लागला. युवतीने प्रतिसाद न दिल्याने त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, यादव याला अद्याप अटक करण्यात आलेली नसून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.