पाटण शहरात मार्केट, नगरपंचायत परिसर, मोरेगल्ली परिसरात श्वानांनी काहीजणांचा चावा घेतल्याची घटना घडली होती. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले होते. अशा प्रकारच्या घटना घडल्याने पाटण शहरात मोकाट श्वानांच्या वाढत्या समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात ठिकठिकाणी मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळत आहे. शहरात सकाळी लवकर दहावी व बारावीतील मुले-मुली क्लासेसला जात असतात. त्यावेळी चौकाचौकांत मोकाट श्वानांचे टोळके ठिकठिकाणी बसलेले असतात. अशावेळी त्या परिसरातून जात असताना हे श्वानांचे टोळके त्या विद्यार्थ्यांवर हल्ला करतात. या श्वानांच्या बचावासाठी पालकांना मुलांना क्लासेसला सोडण्यासाठी सोबत जावे लागत आहे. याबरोबर शहरात सकाळी फिरायला जाणाºया ज्येष्ठ नागरिकांची, महिलांची संख्यादेखील अधिक आहे. अशावेळी त्यांच्या अंगावरदेखील हे मोकाट श्वानांचे टोळके धावून जाते. त्यामुळे सकाळी फिरायला जाताना नागरिकांना हातामध्ये काठी घेऊन बाहेर पडावे लागत आहे. शहरात सध्या गल्लोगल्ली या श्वानांची संख्या वाढत असल्याचे दिसते. नगरपंचायतीच्या माध्यमातून या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
- चौकट
पार्किंगमध्येही रात्री ठिय्या
मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये श्वानांचा वावर होत आहे. रात्री वाहनांच्या पार्किंगमध्ये वाहने लावतानादेखील तेथील नागरिकांच्या अंगावर श्वान धावून जात आहेत. याबरोबर पार्किंगमध्ये रात्री-अपरात्री श्वानांच्या भुंकण्याचा आवाज घुमत असतो. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो : ११केआरडी०६
कॅप्शन : प्रतीकात्मक