नागरिकांना विसर
सातारा : कोरोना कमी झाला आहे; पण संपलेला नाही याचे भानच नागरिकांना राहिले नसून स्वच्छता, मास्क व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा विसर पडू लागला आहे. अनलॉकनंतर जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आले असून, नागरिक घराबाहेर पडू लागलेत.
नागरिक त्रस्त
वाई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने लावत आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महागणपती घाटावरील जुन्या व नव्या पुलावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बसस्थानकांमध्ये गर्दी
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागातून खरेदीसाठी लोक साताऱ्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसस्थानकात गर्दी वाढत आहे. महामंडळाने गाड्या सुरू केल्या असल्या तरी फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे
पाण्याचा अपव्यय
सातारा : शहराच्या अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र त्याची सातारकरांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. पालिकेकडून उन्हाळ्यात पाण्याची कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याची बचत करण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी.
धुळीमुळे अपघात
सातारा : साताऱ्यातील अनेक मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माती वर आली आहे. त्यातूनच वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे अनेक भागात धुळीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहने चालविताना डोळ्यात धूळ जात असल्याने वाहने चालविणे अवघड होत आहे.