सुनीता नलवडे -लोहोम -खंडाळा तालुक्यात महामार्गालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. नवनवीन उद्योगधंदे या भागात उभे राहत असल्यामुळे उद्योगदारांकडून चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी आपल्या जमिनी विकून मिळणारे पैसे खात्यात टाकत आहेत. तसेच शेती तोट्यात जात असल्यामुळे तरुणपिढी गाव सोडून शहरात शिक्षणासाठी राहत असून पालक त्यांच्या खात्यावर पैसे जमा करत आहेत. त्यामुळे पैसे खात्यात अन् मुलं शहरात असे चित्र पाहायला मिळत आहे.पाण्याशिवाय शेती पिकू शकत नाही. लहरी पावसामुळे शेती तोट्यात चालली आहे. घरसंसार चालविण्यासाठी गाव सोडून शहरात नोकरीधंद्यासाठी जावे लागत आहे. इच्छा असून मुलांना चांगले शिक्षण देता येत नाही, अशा अनेक प्रश्न सतत डोक्यात घर करून राहत असल्यामुळे हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. एकीकडे तोट्यात चाललेली शेती अन् दुसरीकडे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जमिनीला आलेले सोन्याचे भाव यामुळे शेतकरी कसलाही विचार न करता आपल्या जमिनी विकून मोकळा होत आहे. चांगलं जीवन जगता यावं, यासाठी पैशांची असलेली गरज यामुळे भागत आहे. तसेच मुलांनाही चांगले शिक्षण देण्यासाठी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी उद्योगांना जमिनी विकत आहेत.विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेती कसण्यासाठी घरात मनुष्यबळ पुरेसे राहिलेले नाही, हेदेखील एक कारण जमीन विकण्यामागे असल्याचे दिसते. मनुष्यबळ कमी आणि जमीन जास्त असलेले शेतकरी जमिनी विकून पैसे बँकेत ठेवत आहेत. जमिनीच्या पैशावर चांगला बंगला अन् व्याजावर घरखर्च भागवायचा. मुलांना शिक्षणासाठी शहरात पाठवायचे हीच परिस्थिती सध्या शिरवळ, सांगवी, नायगाव, जवळे, कवठे, लोहोम, झगलवाडी, लिंबाचीवाडी तसेच खंडाळा तालुक्यातील प्रत्येक खेड्यात दिसून येत आहे. शहरातील बिल्डर खेड्यात जमिनी घेतात. तिथे इमारती बांधून किंवा प्लॉट पाडून वाढीव दराने विकतात. अशा प्रकारे ग्रामीण भागाचे चित्र पालटलेले पाहायला मिळत आहे. गावपण राहिलं नाहीमहामार्गालगत पूर्वी असणाऱ्या वाड्यावस्त्यांवरील जीवन आता पूर्णपणे बदलून गेले आहे. विविध कंपन्या या भागात आल्यामुळे उद्योजक चांगला भाव देऊन शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते एवढे पैसे शेतकऱ्यांचे हातात एकदम मिळत असल्यामुळे शेतकरी खुश आहेत. साध्या कुडामेडीच्या, कौलाच्या, पत्र्याच्या घरातून शेतकरी आता बंगल्यात राहू लागला आहे. त्यामुळे खेड्यांचे रूपडे पार बदलून गेले आहे.खेड्यांचा भौतिक विकास झाला असला तरी माणसांविना खेडी ओस पडू लागली आहेत. जमिनी विकल्यामु ळे तरुणपिढी शहरात नोकरीधंदा, शिक्षणासाठी राहू लागली आहे. त्यामुळे गावाकडे बांधलेल्या बंगल्यात आजी-आजोबा, म्हातारी माणसं राहत असल्याचे दिसत आहे.
पैसे खात्यात... मुलं शहरात !
By admin | Published: July 09, 2015 9:25 PM