लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दैनंदिन व्यवहारासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नाण्यांची निर्मिती केली. नाण्यांमुळे व्यवहार करणेही सोपे झाले. मात्र, बाजारपेठेत दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद झाल्याची अफवा पसरल्याने अनेक व्यापारी, विक्रेते सध्या दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार दर्शवीत आहेत. कोणतेही नाणे चलनातून बाद करण्यापूर्वी आरबीआयकडून तशी अधिकृत माहिती दिली जाते. यानंतर निर्णयावर अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(चौकट)
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
बाजारपेठेत एक, दोन, पाच व दहा रुपयांची नाणी चलनात असताना केवळ अफवेमुळे अनेकांची दिशाभूल होऊ लागली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या चलनात असलेले कोणतेही नाणे व्यवहारातून बंद केले नाही.
(चौकट)
दहाचे नाणे नाकारतात
वजन अधिक असल्याने दहा रुपयांचे नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा बाजारपेठेत पसरविली गेली आहे. त्यामुळे अनेक जण हे नाणे स्वीकारण्यास नकार देतात. शहरातील बँकांमध्येही दहाचे नाणे जमा करण्याचे प्रमाण अधिक आहे; परंतु ते नाणे घेण्यास अनेकांचा नकार असतो.
(चौकट)
बॅँकांमध्ये नाण्यांचा मोठा साठा
पाच व दहा रुपयांचे नाणे नोटांच्या तुलनेत वजनाने जड असते. त्यामुळे नाणी स्वत:सोबत बाळगणे सोयीचे ठरत नाही. त्यामुळे बॅँकांमध्ये पाच व दहा रुपयांच्या नाण्यांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.
(चौकट)
पैसा असून अडचण
काही दिवसांपूर्वी मंडईत एका विक्रेत्याने दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिला. का? तर म्हणे ते बंद झाले आहे. मंडईत ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. काही विक्रेते नाणे घेतात तर काही नाकारतात. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.
- प्रशांत दळवी, सातारा
(चौकट)
काही दिवसांपूर्वी पाच रुपयांची नोट व आता दहा रुपयांचे नाणे चालत नसल्याचे छोटे-मोठे विक्रेते सांगतात. त्यामुळे स्वत:जवळ दहा रुपयांचं नाणं बाळगणं नको वाटत आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- विजया बावळेकर, महाबळेश्वर
(कोट)
चलनातून कोणतेही नाणे बंद झालेले नाही. अशा प्रकारच्या अफवेवर नागरिक, व्यापारी, दुकानदारांनी विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी.
- अस्मिता बनसोडे, ऑफिसर क्रेडिट, बँक ऑफ इंडिया