लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या नावावर खरेदी केलेल्या मिळकतीचे मुद्रांक शुल्क एक टक्का कमी केलं आहे. गृहस्वामिनीच्या नावावरील मिळकत आता पैशांची बचत करणार असून, नेहमीच्या व्यवहारानुसार तब्बल दोन कोटींचेे मुद्रांक शुल्क वाचणार आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये पवार यांनी राजमाता गृहस्वामिनी ही नवीन योजना जाहीर केली. राज्यामध्ये इथून पुढे महिलांच्या नावावर घर अथवा इतर स्थावर मिळकत खरेदी केली तर मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे.
घर, जमिनींचे दर गगनाला भिडलेले आहेत. कोट्यवधींचे व्यवहार या माध्यमातून होत असतात. या व्यवहारातून राज्य शासनाच्या तिजोरीत मोठा महसूलही जमा होत असतो. महिलांच्या नावावर मिळकत खरेदी करण्यासाठी या निमित्ताने आता प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच महिलांना आर्थिक आणि सामाजिक संरक्षणही या योजनेच्या निमित्ताने मिळू शकते.
पुरोगामी राज्य म्हणून देशभर नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रात महिलांना पुरुषांप्रमाणे समान दर्जा आणि समान संधी देण्यावर शासनाचा भर राहिला आहे. आता या नव्या योजनेनुसार महिलांना संरक्षण देण्यासोबतच त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्नही राज्य शासनाने केलेला दिसतो.
दरम्यान, सप्टेंबर २०२० पूर्वी ग्रामीण भागात पाच टक्के, तर शहरी व प्रभाव क्षेत्रामध्ये सहा टक्के इतके मुद्रांक शुल्क घेतले जात होते. त्यानंतर राज्य शासनाने सप्टेंबर २०२० पासून मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डिसेंबर २०२० अखेर ग्रामीण भागासाठी दोन टक्के, तर शहरी भागासाठी तीन टक्के इतके मुद्रांक शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर मिळकतींचे व्यवहार झाले. १ जानेवारी २०२१ पासून शासनाने १ टक्का मुद्रांक शुल्क वाढविले होते. आता महिलांना मुद्रांक शुल्कात सूट दिल्याने घर अथवा कुठलीही स्थावर मिळकत खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
पॉइंटर
२०१९-२० या आर्थिक वर्षात गोळा झालेला मुद्रांक शुल्क
१९० कोटी ६४ लाख ७५ हजार
एकूण दस्तांची संख्या : ५३ हजार ९२
२०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील मुद्रांक शुल्क
१०५ कोटी ५७ लाख ८५ हजार
एकूण दस्तांची संख्या : ४७ हजार ७९३
सध्याचे मुद्रांक शुल्क कसे आहे
ग्रामीण भागासाठी : ३ टक्के
शहरी भाग व प्रभाव क्षेत्रासाठी : ४ टक्के
कोट
महिलांच्या नावावर मिळकत खरेदी केली तर मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील जनतेला निश्चितपणे याचा मोठा फायदा होणार आहे. मुद्रांक शुल्क वाचणार असल्याने व्यवहारही वाढतील, अशी अपेक्षा आहे.
- मंगेश खामकर, सहजिल्हा निबंधक वर्ग २ तथा प्रशासकीय अधिकारी
घराचा प्रतीकात्मक फोटो वापरावा.