सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राजे अद्याप जाहीरपणे एकत्र आले नाहीत. त्यामुळे सातारा पालिकेतील दोन्ही आघाडींच्या नगरसेवकांचे सूरही एकमेकांविरोधी आहेत. असेच वातावरण राहिले तर याचा फटका निवडणुकीत उदयनराजे यांच्या सातारा शहरातील मताधिक्यालाबसू शकतो. तसेच युतीचा उमदेवार निश्चित न झाल्याने भाजप नगरसेवक कोणाला मदत करणार? यावरही राजकीय चित्र अवलंबून असणार आहे.सातारा पालिकेत पूर्वी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीची सत्ता होती. मात्र २०१६ च्या पालिका निवडणुकीत दोन्ही राजेंमधील मनोमिलन तुटले. या निवडणुकीत खासदार गटाच्या शिलेदारांनी नगराध्यक्षपदासह पालिकेचा गड काबीज केला. तर आमदार गटाचे केवळ १२ नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले. या दोन्ही राजेंच्या सत्तासंघर्षाचा मात्र भाजपला फायदा झाला. भाजपच्या सहा नगरसेवकांनी विजय मिळवित पालिकेत जोरदार प्रवेश केला.मनोमिलन तुटल्यानंतर दोन्ही राजेंमधून साधा विस्तवही जात नव्हता. वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून याचा प्रत्यय सातारकरांसह संपूर्ण राज्याने वारंवार अनुभवला. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक आजही उघडपणे नाराजी व्यक्त करतात. मात्र, याचा फारसा प्रभाव आघाडीप्रमुुख व सत्ताधाऱ्यांवर झालेला नाही. राजेंच्या मनोमिलनासाठी काही नगरसेवकांनी पुढाकारही घेतला; परंतु याचे कोणतेही संकेत अद्याप दोघांनी दिले नाहीत. गत दोन लोकसभा निवडणुकीचा विचार करता उदयनराजे यांना सातारा लोकसभा मतदार संघातून सर्वाधिक मतदान झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीतही त्यांना या मतदार संघातून १ लाख ११ हजार ९७० इतके मतदान झाले होते. तर त्यांचे विरोधी उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना ११ हजार २१९ मते मिळाली होती. या व्यतिरिक्त आम आदमी पार्टीचे राजेंद्र चोरगे, संदीप मोझर, पांडुरंग शिंदे यांनाही या मतदार संघातून मते मिळाली होती.उदयनराजेंच्या विजयामध्ये पालिकेच्या सर्व नगरसेवकांसह समर्थकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजेंच्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी पालिकेत मात्र मनोमिलनाच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. पालिकेत खासदार गटाच्या आघाडीची सत्ता असली तरी ४० पैकी १८ नगरसेवक विरोधी बाकावर बसले असून, यामध्ये भाजपचे सहा नगरसेवक आहेत. या सर्वांचे मतभेद दूर करण्याचे अग्निदिव्य उदयनराजेंना करावे लागणार आहे. अन्यथा सर्वाधिक मतदान करणारा सातारा मतदारसंघ मताधिक्य घटवून त्यांना डोकेदुखी ठरू शकतो.
राजेंपुढे मनोमिलनाचे अग्निदिव्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:48 PM