सातारा : जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तरीही शनिवारी साताऱ्यासह पश्चिम भागात अनेक ठिकाणी धुवाॅंधार पाऊस पडला. तर पूर्व दुष्काळी भागातही धो-धो पाऊस झाला. यामुळे ओढे भरुन वाहिले. तसेच पुलावरुन पाणी गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. तर या पावसामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण असून खरीप पेरणीला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात मागील दोन वर्षांत मान्सूनचा पाऊस १० जूननंतर दाखल झाला. त्यानंतरही पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला होता. यंदा मात्र मान्सून वेळेवर दाखल झाला आहे. जिल्ह्यात गुरूवारपासूनच पाऊस पडू लागलाय. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजा या भागात चांगला होत आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांतीलही अनेक गावांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री तर सातारा शहरात विजांच्या कडकडाटात पाऊस पडला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. त्यातच शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर शनिवारी दुपारच्या सुमारासही सातारा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पाऊस कोसळत होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास पाऊस थांबला. पण, त्यानंतरही आभाळ भरुन आले आणि सायंकाळी साडे पाच वाजल्यापासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे शहरातील गटारी भरुन वाहिली. तसेच सर्व रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. सखल भागातही पाणी साचून राहिले.पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या भागात चांगला पाऊस झाला. माणमधील वरकुटे मलवडी, शेनवडी, कुरणवाडी, काळचाैंडी परिसरात दमदार पाऊस पडला. यामुळे काही ठिकाणी ओढ्याला पाणी आले. तसेच जमिनीतही पाणी साचून राहिले. हा पाऊस खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तालुक्यातीलच मार्डी, पळशी, मोही परिसरातही पावसाने चांगलेच झोडपले. तासभर झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते.फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात सलग तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शनिवारच्या पावसामुळे आदर्की, हिंगणगाव ओढ्याला पूर आला होता. सावतानगर आणि पठाण वस्तीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहिल्यामुळे काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. खंडाळा तालुक्यातही पाऊस झाला. खंबाटकी घाट आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर पावसामुळे समोरील काहीच दिसत नसल्याने महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.
कोयना, नवजाला आतापर्यंत ३७ मिलिमीटर पाऊस..जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १२ आणि नवजा येथे २१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला पाऊस झाला नाही. तर १ जूनपासून आतापर्यंत कोयना आणि नवजा येथे प्रत्येकी ३७ आणि महाबळेश्वरला १२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. इतर भागातही पाऊस झाला आहे.