सातारा : शहरासह जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, वाई तालुक्यांत रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांमध्ये वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वाई तालुक्यातील बदेवाडी येथे बाभळीचे मोठे झाड महावितरणच्या हायटेन्शन तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी येथे पंधरा मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले, तलाव भरून वाहू लागले आहेत.साताºयासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली.जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाºयासह मुसळधार पाऊस झोडपून काढले. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. रविवारी बाजार असल्याने बाजारकरूंची चांगलीच तारांबळ उडाली. शाळा काही दिवसांत सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आले आहेत. पावसामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली. शहरातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.फलटण शहर व परिसरात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला होता.फलटणकर कडक उन्हाळा आणि उष्मामुळे हैराण झाले असताना रविवारी अचानक वादळी वाºयासह आणि गारांसह १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. पावसामुळे बराच वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात आलेल्या शेतकरी व नागरिकांची त्रेधा उडाली.
जिल्ह्यात मेघगर्जनेसह मान्सून बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:02 PM