सातारा : जिल्हा बँकेची निवडणूक स्थगित झाली असली तरी राजकीय जुमल्यांसाठी आता महिनाभराचा कालावधी उरलेला आहे. या महिनाभरात महाविकास आघाडी, महायुती यांचे धोरण निश्चित होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. ही बँक गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या जिल्हा बँकेत प्रवेश करण्यासाठी भाजपने रणनीती आखलेली आहे. मात्र, मर्यादित मतदारांची संख्या ही भाजपसमोरील समस्या आहे.
बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले यांच्या स्थानिक वर्चस्वात असलेल्या सहकारी संस्थांच्या बळावर भाजप जिल्हा बँकेत शिरकाव करण्यासाठी सज्ज आहे.
बँकेची निवडणूक पक्षांऐवजी नेत्यांभोवतीच फिरत आहेत. या चर्चेमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हेच आघाडीवर आहेत. या नेत्यांच्या भूमिकेला निवडणुकीत विशेष महत्त्व आहे. दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनीही राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवले आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव या पाच तालुक्यांत या दोन्ही नेत्यांचे बळ आहे. हे बळ राष्ट्रवादीसाठी पोषक ठरणारे आहे.
राज्यातील सत्ता हेदेखील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे शस्त्र आहे. तसेच सहकार खाते बँकेचे तज्ज्ञ संचालक बाळासाहेब पाटील यांच्याकडेच असल्याने राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढलेली आहे. सोसायटी मतदारसंघासह इतर मतदारसंघांमध्ये मंत्री पाटील यांचा प्रभाव राष्ट्रवादीला पोषक ठरणारा आहे. भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक तालुक्यातून उमेदवारीची तयारी केलेली आहे. आपल्याला पोषक असे ठरावदेखील केलेले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केलेल्या बिनविरोधच्या मोहिमेला भाजप ब्रेक लावण्याचीही शक्यता आहे. भाजपला जादा जागा वाढवून मिळणार का?, राष्ट्रवादीचे नेते काय धोरण राबविणार?, शिवसेना, काँग्रेस या पक्षांची भूमिका काय असणार? याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत.
चौकट..
मतदार यादी प्रसिद्धी लांबणीवर
जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे ठराव जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहेत, त्यांची छाननी करून २ मार्चपर्यंत सहकार विभागात जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, दि. १२ मार्च रोजी ठरलेल्या कार्यक्रमानुसार मतदार यादी प्रसिद्धी होणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. शासनाने ३१ मार्चपर्यंत निवडणुकीला स्थगिती दिली असल्याने १ एप्रिलनंतरच प्रशासकीय घडामोडी होणार आहेत.
जिल्हा बँकेचा फोटो व लोगो वापरावा