नगराध्यक्ष रोहिणी शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जनशक्ती विकास आघाडीचे नेत राजेंद्र यादव यांनी सभेला सुरुवात होताच, सभेत काय बोलायचे, कोणता विषय आहे, तो कोण मांडणार याबाबत सत्ताधारी असूनही आम्ही अनभिज्ञ आहोत. त्यामुळे सभा तहकूब करावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेला भाजपसह लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी समर्थन देत कार्यालयीन अहवाल मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे सभा तहकूब झाली. त्यापूर्वी कारंजे व कार्वे नाका येथे सीसीटीव्हीची कामे सुरू करण्यासाठी कार्योत्तर मंजुरी देण्याचेही बैठकीत ठरले. सभेत ११६ विषय असल्यामुळे सभा उशिरापर्यंत चालेल, अशी अपेक्षा होता. मात्र प्रत्यक्षात सभा सुरू होताच सभेतील विषयांचा कार्यालयीन अहवाल मिळाला नसल्याचा आक्षेप नोंदवत जनशक्ती आघाडी आक्रमक झाली.
गटनेते राजेंद्र यादव यांनी आक्रमक भूमिका मांडत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘आत्ता सभेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. तरीही त्या सभेतील विषयांचा कार्यालयीन अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अत्यंत ढिसाळ काम सुरू आहे. सभेत विषय काय मांडायचा, कोणत्या विषयावर काय चर्चा करायची, याचे ज्ञानच आम्हाला नाही. सत्ताधारी असूनही ही अवस्था आहे त्यामुळे आजची सभा तहकूब करावी’ अशी मागणी राजेंद्र यादव यांनी केले. त्यांच्या म्हणण्याला भाजपनेही समर्थन दिले. कार्यालयीन अहवाल मिळत नसल्याचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारूक पटवेकर यांनी उपस्थित केला. त्याचवेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनाही असा अहवाल मिळालेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे गोंधळ उडाला. यावेळी आरोग्य सभापती वाटेगावकर यांनी अहवालच नाही, तर सभा निघालीच कशी, तीही प्रथा बंद करावी. कार्यालयीन अहवाल मिळत नाही. तोपर्यंत सभा काढूच नये, अशी भूमिका मांडली.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी खुलासा करावा, असा आग्रह केला. डाके यांनीही यापुढे कार्यालयील अहवाल वेळेत मिळतील, असे स्पष्ट केले. कार्यालयीन अहवाल नसल्यानेच सभा सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली. पुन्हा सोमवारी सभा होईल.
- चौकट
यादव-पावसकर यांच्यात खडाजंगी
शहरातील विविध ठिकाणी कारंजे होणार आहेत. मग प्रीतिसंगम बागेतील कारंजे का सुरू होत नाहीत, असा प्रश्न ज्येष्ठ नगरसवेक विनायक पावसकर यांनी सभागृहात केला. त्यावरून गटनेते राजेंद्र यादव व पावसकर यांच्यात खडाजंगी झाली. तो विषय घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे, भाजप म्हणून तुम्ही तो विषय का घेत नाही, असे एकमेकांवर त्यांनी आरोप केले. त्यामुळे आगामी काळात प्रीतिसंगम बागेतील कारंजावरून राजकीय फवारे निश्चित उडणार हेही स्पष्ट झाले.