'मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण संपल्यानेच दरवाढ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 06:08 PM2021-11-15T18:08:29+5:302021-11-15T18:10:15+5:30
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मोदींनी सात वर्षांत २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल, पेट्रोलवरील कर गोळा केला आहे. निवडणुकीमध्ये निराशाजनक निकाल लागल्यानंतर त्यांनी लगेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या.
कऱ्हाड : ‘मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मोदींनी सात वर्षांत २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल, पेट्रोलवरील कर गोळा केला आहे. निवडणुकीमध्ये निराशाजनक निकाल लागल्यानंतर त्यांनी लगेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या. त्यामुळे डिझेल, पेट्रोलचे दर कमी करणे शक्य असतानाही मोदी सरकारकडून केवळ नफाखोरी आणि लूट सुरू आहे. या दरवाढीमुळे शेतकरी, सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण संपले आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
येथील तहसील कार्यालयावर सोमवारी कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारने वाढवलेल्या भरमसाठ महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार देशभरामध्ये १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान उभारले आहे. त्याचा रविवारी कऱ्हाडमध्ये प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने हा मोर्चा काढला. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्ष नीलम येडगे, काँग्रेसचे कऱ्हाड शहराध्यक्ष राजेंद्र माने, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण, हेमंत जाधव उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे आता लोकांना पुन्हा घोडा, बैलगाडी, सायकल वापराशिवाय पर्याय उरलेला नाही. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळेच ही महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती स्थित व कमी होत असतानाही दरवाढ करून केंद्र सरकार सामान्य माणसांची लूट करत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. सरकार चालवण्यासाठी त्यांना डिझेल, पेट्रोल दरवाढ करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.
दरम्यान, येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या निषेध मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीमध्ये बसून डिझेल, पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मोर्चा कोल्हापूर नाक्यावरून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. त्यानंतर याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.