वडूज : ‘विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे तिकिट मिळावे म्हणून मातोश्रीचे उंबरे झिजवले. नंतर शिवसेनेच्या जीवावर मतांचा जोगवा मागत निवडून येऊन मंत्रिपदे मिळवली आणि आपल्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून गाजावाजा शिवसेनेच्या जीवावर केला. आता आर्थिक प्रलोभनांमुळे पक्षाशी गद्दारी केलेल्या जिल्हातील शिवसेना आमदारांना जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार,’ असा इशारा शिवसेनेचे खटाव तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यानी दिला. दरम्यान, बंडखोर आमदारांचा प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून मिरचीची धुरी देण्यात आली.वडूज येथे मंगळवारी बंडखोर आमदारांविरोधात खटाव तालुका शिवसेनाच्या वतीने मोर्चा काढून बंडखोर आमदारांच्या तसेच मंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई व आमदार महेश शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा झाडाला टांगून मिरचीची धुरी देत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपतालुका प्रमुख महेश गोडसे, विभाग प्रमुख आबासाहेब भोसले, शहरप्रमुख सुशांत पार्लेकर, महिला संघटीका राणीताई काळे, महिला उपतालुका प्रमुख सलमा शेख, संध्या देशमुख, धनश्री इनामदार, जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.शहाजीराजे गोडसे म्हणाले, ‘खटाव तालुका शिवसेना ही पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून गद्दारी केलेल्यांना यापुढच्या काळात कायमची अद्दल घडवली जाईल.’युवराज पाटील म्हणाले, ‘ठाकरे यांनी मोठी पदे देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.’याप्रसंगी उपतालुका प्रमुख बाळासाहेब जाधव, महिला तालुका प्रमुख राणी काळे, महिला उपतालुका प्रमुख सलमा शेख, महिला विभागप्रमुख संध्या देशमुख, गटप्रमुख धनश्री इनामदार यांची मनोगते झाली. यावेळी बाळासाहेब जाधव, संतोष दुबळे, विशाल चव्हाण, दिलशाद तांबोळी, आशाताई कोळी यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
गद्दारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, वडूज येथे प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून दिली मिरचीची धुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 5:03 PM