सातारा : पुणे येथे रविवारी महामोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील गर्दीचा फटका वाहतुकीला बसला. पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या एसटी गाड्या चार तास उशिराने धावत होत्या. खासगी वाहनांनाही पुण्यातून बाहेर पडता येत नसल्याने दुपारीच्या वेळेत महामार्ग सुनसान बनले होते. पुणे येथील मोर्चाने अपेक्षित सर्व विक्रम मोडीत काढले. निवेदन देणाऱ्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या तरी मोर्चा डेक्कनमध्येच होता. त्यामुळे साताऱ्याच्या दिशेने गेलेले आंदोलनकर्ते कात्रज ते स्वारगेट या मार्गावरच वाहने लावून चालत गेले होते. तसेच सर्वच रस्त्यांवर आंदोलनकर्त्यांची गर्दी असल्याने पुण्यातून बाहेरगावी जाणारी वाहतूक सकाळपासून ठप्प होती. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्याही उशिराने धावत होत्या. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी बारा वाजता पोहोचणे अपेक्षित असणाऱ्या एसटी गाड्या चार वाजेपर्यंत आल्याच नाहीत. बाराची गाडी साधारणत: साडेचारनंतर येण्यास सुरुवात झाली. एसटी वेळेवर मिळत नसल्याने अनेक प्रवासी महामार्गावर थांबून खासगी प्रवासी गाड्यांची वाट थांबत होते. मात्र, खासगी गाड्याही येत नसल्याने त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी) मध्यरात्रीही संथ वाहतूक पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच आंदोलनकर्ते पुण्यात दाखल होऊ लागले होते. याचा परिणाम मध्यरात्रीच्या वाहतुकीवरही जाणवला. खासगी वाहनेही तीन तास उशिराने येत होती. खंडाळा बसस्थानकात या गाड्या आल्याच नाही मुंबई, पुण्याकडून येणाऱ्या अनेक गाड्या खंडाळा बसस्थानकात येतात. त्याठिकाणी नोंदी करून त्या साताऱ्याच्या दिशेने मार्गस्थ होतात. मात्र, रविवारी अनेक गाड्या दुपारपर्यंत आल्याच नव्हत्या. यामध्ये मुंबई-औंध, मुंबई-रहिमतपूर, मुंबई-वडूज, पुणे-पाटण, वल्लभनगर-पाटण, मुंबई-वाई या दुपारपर्यंत येणाऱ्या गाड्या आल्याच नाहीत. तर काही गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे शेकडो प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. पाच तालुक्यांतील मावळे पाचवडला जमणार महामोर्चाची तयारी : मोर्चादिनी दोन हजार स्वयंसेवकांचे रस्त्याच्या दुतर्फा मदतकार्य पाचवड : सोमवार, दि. ३ आॅक्टोबर रोजी साताऱ्यामध्ये निघणाऱ्या सातारा क्रांती महामोर्चासाठी वाई, महाबळेश्वर, खंडाळा, जावळी व कोरेगाव तालुक्यांचा पश्चिमेकडील भागामधून साताऱ्याकडे कूच करण्ण्यासाठी सर्व मराठा बांधव पाचवडमध्ये एकत्र येणार आहेत. या सर्व तालुक्यांसाठी मध्यबिंदू ठरणारे पाचवड गाव मराठामय होणार असून, सुमारे ६ लाख मराठे याठिकाणी एकत्र येतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. या सर्व मराठा बांधवांना सुस्थितीत मार्गक्रमण करता यावे याकरिता पाचवड, अमृतवाडी, चिंधवली, आसले, भुर्इंज, उडतारे तसेच खडकी गावांमधील सुमारे दीड ते दोन हजार स्वयंसेवक रस्त्याच्या दुतर्फा मदत कार्यासाठी सज्ज राहणार आहेत. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील पाच तालुक्यांचा समन्वय साधणारे एकमेव ठिकाण पाचवड असल्याने या सर्व तालुक्यांमधून याठिकाणी ३ आॅक्टोबर रोजी मोठ्या संख्येने मावळे एकत्र येणार आहेत. महाबळेश्वर, पाचगणी व वाईमधील सर्व मराठा समाज पाचवड बाजारपेठेच्या मुख्य चौकामधून साताऱ्याकडे मार्गक्रमण करणार आहेत. तसेच खंडाळा, शिरवळ व कोरेगावचे पश्चिमेकडील भागातील बहुतांशी मराठे जोशी विहीर मार्गे पाचवडमध्ये दाखल होऊन पुढे मार्गक्रमण करणार आहेत. त्याचबरोबर जावळीकडील कुडाळ, हुमगाव, सोमर्डी, वालूथ व इतर मोठ्या गावांबरोबरच वाडी-वस्त्यांवरील मराठी मावळे मोठ्या संख्येने पाचवड येथे येऊन साताऱ्याकडे कूच करणार आहेत. त्यामुळे या सर्व भागामधून येणाऱ्या मावळ्यांची संख्या पाहता पाचवडमध्ये सुमारे ६ लाखांहून अधिक मावळे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढा मोठा समाज पाचवडमध्ये एकत्रित येत असल्याने वाई तालुक्याबरोबरच पाचवड बाजारपेठ बंदची हाक सर्व ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिली असून, येथील सर्व युवकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी केली आहे. पाचवडमधील सर्व ग्रामस्थांनी घराला टाळे ठोकून मराठा क्रांती महामोर्चासाठी शंभर टक्के सहभागी होण्याची शपथ घेतली आहे. (वार्ताहर) युवतींचा सहभाग वाढला मराठा क्रांती मोर्चामधील लोकांच्या सहभागाचा ठिकठिकाणी जसजसा उच्चांक होत आहे, तसतसा साताऱ्यामध्ये ग्रामीण भागातील युवतींचा साताऱ्यातील महामोर्चासाठी सहभागाचा टक्का वाढत आहे. इतर जिल्ह्यातील युवतींमुळे प्रेरित होऊन आता साताऱ्यामधील मुलींनीही या महामोर्चामध्ये सामील होण्याचा विडा उचलला आहे. याची झलक पाचवडमध्ये नुकत्याच झालेल्या मोर्चाच्या बैठकीमध्ये दिसून आली. उपस्थित असलेल्या सर्व महिला व मुलींनी मराठा क्रांती मोर्चाची कारणे उपस्थित मराठ्यांपुढे आक्रमकपणे मांडून पुढील पिढीसाठी मोठ्या संख्येने ३ आॅक्टोबर रोजी साताऱ्याच्या मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मोर्चा पुण्यात.. सुनसान महामार्ग साताऱ्यात
By admin | Published: September 25, 2016 11:59 PM