लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : जन्म म्हटलं की, मृत्यू अटळ आहे. मृत्यू झाल्यानंतर पै-पाहुणे, मुलं-मुली शेवटचा निरोप द्यायला येतात. पण, कोरोनाची महामारी आली आणि हक्काची माणसं क्षणात देह सोडू लागली. संसर्गाची भीती असल्याने ना रडणं, ना अंत्यविधी, ना शेवटचं घोटभर पाणी. फक्त दुरून पाहाणे एवढंच नशिबी आलं आहे, अशा बाका प्रसंगात पाचगणीतील मुकुंद मगर मात्र मृतांचे नातेवाईक बनले. त्यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिकजणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यासाठी ते काही महिन्यांपासून स्मशानभूमीतच राहतात.
कोरोना संसर्ग वाढल्यानंतर कोरोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले. या मृतदेहांची विल्हेवाट लावणे, सोपस्कार झालं. शासकीय व्यवस्थेतील कोरोना योद्धेही हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणून देतात. नातेवाईक तर संसर्गाच्या भीतीने दूरच राहतात. आत्ताच्या कोरोनाच्या भयग्रस्त परिस्थितीत पाचगणीच्या वैकुंठ स्मशान भूमीत मुकुंद मगर यांना पाचगणी पालिकेच्यावतीने अंत्यसंस्काराकरिता नेमण्यात आले आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता ते या कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार करतात. शेवटच्या क्षणी त्यांचा नात्याचा कोणीही नसताना स्वतःच सरणाची लाकडे रचित त्यांना अखेरचा पाण्याचा घोट पाजून मुखाग्नी देत मुलाचे कर्तव्य पार पडत आहेत. दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन करीत स्वच्छता राखून नव्याने मृतदेहाची वाट पाहात बघणं, हे त्यांचे नित्याचे काम झाले आहे.
मुकुंद मगर हे १९९६ पासून अंत्यविधीचे काम करत आहेत. एड्समुळे मृत्यू झालेला असल्यास अंत्यसंस्कार करण्यास पुढे येत नव्हते. त्यावेळेस त्यांनी पाचगणीत स्वतः पुढे येत अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी १४५ एइ्सग्रस्तांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोना संसर्गात गेल्या वर्षीच्या लाटेत त्यांनी स्मशान भूमीत २८ दिवस मुक्काम करून अंत्यसंस्कार केले आहेत. आता दुसऱ्या लाटेत स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवत कोरोनाग्रस्तांचे अंत्यविधी हा अवलिया करीत आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाग्रस्तांची मृत्यूपश्चात सेवा करण्याचे भाग्य लाभणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मृत्यूपश्चात मुलाचे कर्तव्य करण्यास मिळणे, हेच मोठं पुण्यकर्म आहे. फळाची अपेक्षा घरण्यापेक्षा माझ्या हातून मृतदेहांना मुखाग्नी देण्याचं भाग्य नशिबी आहे.
- मुकुंद मगर
कोरोना योद्धा, पाचगणी
सोबत फोटो २४पाचगणी-कोरोना
पाचगणी येथील वैकुंठ स्मशान भूमीत कोरोनाग्रस्त मृतदेहांवर मुकुंद मगर हे सहकाऱ्यांसमवेत अंत्यसंस्कार करत असतात.