कऱ्हाड : कऱ्हाडातील बबलू माने खून व मोक्का प्रकरणाचा तपास करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आॅक्टोबर महिन्यात तपासी अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. संबंधित मुदत ५ डिसेंबर रोजी संपली. त्यामुळे आणखी मुदतवाढ मिळण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून पोलिसांना दुसऱ्यांदा ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. शहरातील टोळीयुद्धानंतर पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. सल्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलिसांनी आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावास पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यासह फिरोज बशिर कागदी (३३), इब्राहिम गफूर सय्यद (४८, दोघेही रा. शनिवार पेठ, कऱ्हाड), मोहसिन दिलावर जमादार (२७, रा. शास्त्रीनगर-मलकापूर, मूळ रा. निपाणी, जि. बेळगाव), जावेद साहेबलाल शेख (२८, रा. मार्केट यार्ड, कऱ्हाड), इरफान हारुण इनामदार (२६, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) व सल्याचा मुलगा आसिफ सलीम शेख (२२, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार या टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात पोलिसांनी बाबर खान खून प्रकरणातील पाच आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मात्र, बबलू माने खून प्रकरण तसेच मोक्काचा तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एच. एन. काकंडकी यांनी न्यायालयाकडे केली होती. (प्रतिनिधी)
मोक्काच्या दोषारोपासाठी पोलिसांना आणखी मुदतवाढ
By admin | Published: December 06, 2015 10:41 PM