लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात अद्यापही कोरोना नियंत्रणात आला नसतानाही अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र, हे मॉर्निंग वॉक अत्यंत जीवघेणे असून आरोग्य चांगले राखण्याच्या नादात घरात कोरोना घेऊन येत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आढळून येत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील कोरोनाची संख्या घटण्याऐवजी वाढतच आहे. जिल्हा प्रशासन आपल्या परीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांची बेफिकिरीही दिसून येत आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासन नागरिकांना वारंवार आवाहन करत आहे. मात्र, याकडे अनेक जण दुर्लक्ष करत असून काहीही काम नसताना बरेच जण घराबाहेर केवळ विरंगुळा म्हणून पडत आहेत. तर, काहीजण मॉर्निंग वाॅकला सातत्याने घराबाहेर पडत आहेत. हे प्रकार साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ला, कास पठार, कुरणेश्वर मंदिर या ठिकाणी विशेषत: पाहायला मिळत आहेत. एकीकडे आरोग्य चांगले राखण्यासाठी लोक घराबाहेर पडत असले, तरी दुसरीकडे बाहेरून येताना घरामध्ये कोरोना घेऊनच लोक येत आहेत. त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण कुटुंबेची कुटुंबे बाधित आढळून येत आहेत. मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडण्यापेक्षा घरातल्या घरात किंवा टेरेसवर प्राणायाम किंवा दोरउड्या असे घरगुती व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकजण जीव धोक्यात घालून मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. युवक, युवती आणि वयोवृद्ध यांचाही मॉर्निंग वॉकला सहभाग असतो. काहीजण चालताना तोंडावरचा मास्क हनुवटीवर आणत असतात. तर, काही जणांच्या तोंडावर मास्कही नसतो. अशाप्रकारे मॉर्निंग वॉक सुरू असल्याचे पाहायला मिळते.
चौकट : पोलिसांकडून १३८ जणांवर कारवाई
साताऱ्यात मॉर्निंग वॉकला अनेकजण घराबाहेर पडत असल्याचे समजल्यानंतर सातारा तालुका आणि शाहूपुरी पोलीस ठाणे तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोनदोन टीम तयार केल्या. या टीमच्या माध्यमातून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यात आले. आतापर्यंत पोलिसांनी १३८ जणांवर कारवाई केली आहे. यातील काही जणांवर गुन्हे दाखल केले, तर काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सध्या पोलिसांची ही पथके गायब झाली आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या आणखीनच वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे.
कोट : कोरोनाची भीती वाटत नाही का?
मला रोज सकाळी जिमला जाण्याची सवय आहे. मात्र, सध्या जिम बंद आहेत. त्यामुळे व्यायामासाठी घराबाहेर पडतो. घरात चांगला व्यायाम होत नाही. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढली तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. व्यायाम करत असल्यामुळे आत्मविश्वास वाढतोय. परिणामी, कोरोनाची फारशी भीती वाटत नाही.
मंगेश जाधव, सातारा
कोट : कोरोनाची भीती बाळगून घरात बसलो तर शरीर बेढब होईल. आम्ही सार्वजनिक ठिकाणी फिरत नाही. मात्र, निर्जन ठिकाणी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडत आहे. काही वेळेला पोलिसांचे लक्ष नसताना आम्हाला घराबाहेर जावे लागते.
धीरज रसाळ, सातारा
चौकट : खुली हवा नव्हे कोरोनाचे विषाणू
अनेकजण मॉर्निंग वॉकसाठी चांगली फ्रेश आणि खुली हवा असते म्हणून बाहेर पडत आहेत. मात्र, याच हवेमध्ये कोरोनाचे विषाणू असण्याची शक्यता असते. सध्या हवेमधूनही कोरोनाचे विषाणू पसरत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खुली हवा घेण्याच्या नादात घरामध्ये येताना कोरोना विषाणू तर घरी घेऊन येणार नाही ना, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.