कऱ्हाड : संचारबंदीच्या काळात जिल्ह्याधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्या ४८ जणांवर कऱ्हाड शहर पोलीस व कऱ्हाड पालिकेच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संचारबंदी व लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच जिल्ह्यातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात २२ एप्रिल पासून संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्या आदेशाचे उल्लंघन करून कराडकर नागरिक रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे चित्र कराडात दिसत आहे. त्याच आनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे, शहर गुन्हे प्रकटीकरणचे पथक व कऱ्हाड पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी शहरात ठिकठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये महिला व पुरुष असे एकूण ४८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. ते संक्रमण तोडण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घरातून मॉर्निंग वॉक अथवा इतर कारणाशिवाय बाहेर पडू नये. जिल्हाधिकार्यांनी घालून दिलेल्या नियमांचे व अटीचे पालन करावे. कराड शहर अगर परिसरात विनाकारण फिरणार्यांवर अशाचप्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.