सातारा : राज्य परिवहन महामंडळाचे सातारा आगार अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे कोपºयांमध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊ लागली आहे. त्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कामावर न जाण्याचा पवित्रा काही कामगारांनी घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतची हाक दिली. त्यानंतर प्रत्येक नागरिकांनी ही मोहिम आपलीशी केली होती. वसाहत, शाळा, मंदिराबरोबरच गाव स्वच्छ केले जात होते. या योजनेचे कौतुकही झाले होते. शासकीय यंत्रणेने यामध्ये कायमस्वरुपी सक्रीय सहभाग घेण्याची गरज आहे. पण सातारा बसस्थानक याला अपवाद ठरत आहे.
सातारा आगार व विभागीय कार्यशाळेत भंगाराचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. यामध्ये टायरची संख्या मोठी आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या टायरमध्ये साठल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. आगार व्यवस्थापकांच्या कक्षेच्या पाठीमागे सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. त्यामुळे डबके तयार होऊन डासांचा उपद्रव वाढला आहे.
आगारातील डिझेल पंप, खराब झालेले आॅईल टाकले जात असलेले ठिकाण, सर्व्हिसिंग सेंटर परिसरात डासांचा त्रास वाढल्याने आजारी पडणाºयांचे प्रमाण वाढले आहे. तसेच जिल्ह्यात साथीचे आजार फैलावत असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावर वेळीच उपाययोजना न राबविल्यास कामावर न येण्याची भूमीका त्यांनी घेतली आहे.