प्रगती जाधव-पाटील
सातारा : क्रीम कमी-जास्त प्रमाणात वापरल्याने त्वचेच्या कोरडेपणाला कोणताही परिणाम होत नाही. थंडीमुळे त्वचेतील रक्ताभिसरणाची क्रिया मंदावते. हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी असल्याने शरीर सीवमची निर्मिती कमी प्रमाणात करते. सीवम आपल्या तैलग्रंथीतून निघणारे एक तेलकट द्रव्य आहे, जे त्वचेला मुलायम आणि तेजपुंज बनविते. तापमानामुळे सीवम गडद झाल्याने ते त्वचेच्या बाहेरील थरावर येऊ शकत नाही. त्यामुळे या दिवसांत त्वचा रुक्ष दिसते. अति गरम पाणी आणि वारंवार त्वचा धुण्याने हा कोरडेपणा वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
हिवाळ्यात त्वचेची सर्वात सामान्य समस्या म्हणजे त्वचा कोरडी, रखरखीत होऊन खाज सुटणे. थंड वारा आणि कोरड्या हवामानामुळे त्वचा कोरडी पडते आणि तिला तडे जाऊ लागतात. त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, भेगा पडणे, हाताचे कोपर, पायाचे घोटे, गुडघे काळे पडणे, रक्त येणे, खाज सुटणे आणि जंतुसंसर्ग होणे अशा वेदनादायी गोष्टींचाही त्रास होतो. इसब, अटॉपिक डर्माटायटिस, सोरायसीस, इचथिओसिस, रोझेशिआ अशा त्वचाविकारांसाठी थायरॉईड, मधुमेह, अशक्तपणा, पोषणमूल्यांचा अभाव, यकृताचे आजार आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉज या बाबीही याला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
वारंवार चेहरा धुणे करतेय त्वचा कोरडी
हिवाळ्यात जितक्यांदा तुम्ही चेहरा साबण किंवा फेसवॉशने धुवाल तितक्यांदा तो कोरडा पडतो. मात्र, क्लेंजिंग केल्याने त्वचेतील नैसर्गिक मॉईस्चरायझर कमी होते. त्याऐवजी सुगंधरहित क्लेंजिंग लोशनचा वापर करावा व मॉईश्चरायझरने हलकासा मसाज करणे अधिक संयुक्तिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
थंडीचा थेट परिणाम एपिडर्मिस्वर
थंडीच्या दिवसांत त्वचेच्या सर्वात पहिल्या थरावर म्हणजेच एपिडर्मिस्वर परिणाम होतो. कोरडेपणामुळे एपिडर्मिस्वर परिणाम होऊन ते आकुंचन पावतात. त्यामुळे हे स्कील सेल्स तुटण्यास सुरुवात होते. त्वचेवर हा परिणाम काही दिवसांत दिसायला लागतो.
लिपस्टिक टाळणे उत्तम
हिवाळ्याच्या दिवसांत ओठांना लिपस्टिक लावण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे. त्याऐवजी पेट्रालियम जेली किंवा लिप क्रिम वापरणे हा उत्तम पर्याय आहे. व्हॅसलीन बरोबरच ॲंटिसेप्टिक लिप बाम, व्हिक्स हे पर्याय फुटलेल्या ओठांना लवकर बरे करतात. रात्री झोपण्यापूर्वी नाभीत तूप लावणे हाही त्यावरचा घरगुती प्रभावी उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. सीवम निर्मिती होण्यासाठी आणि त्वचेतील तैलग्रंथी ॲक्टिव्ह राहण्यासाठी मॉईश्चरायझरचा वापर होणे आवश्यक आहे. याबरोबरच गारठ्यापासून बचावासाठी कडक गरम पाणी आंघोळीसाठी घेणे टाळावे. अति उष्ण पाण्याने त्वचा अधिक कोरडी पडते.- डॉ. आण्णासाहेब कदम, त्वचारोगतज्ज्ञ, सातारा