सातारा : कोरोना काळात लोकांना सेवा मिळत नसल्याने लोक प्रशासनाने दिलेल्या कंट्रोल रुमच्या फोन नंबरवर मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहेत. रुग्णाला बेड मिळावा, लसीकरण कुठे चालू आहे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन नियम काय आहेत? याबाबत विचारणा करणारे लोक जास्त आहेत.
कोरोना काळात लोकांना तत्काळ सेवा मिळावी. रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ती माहिती मिळावी, या हेतूने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कंट्रोल रुम सुरू केली. या रुममध्ये २४ तास सेवा दिली जात आहे. कोरोेनाचा प्रसार जेव्हा मोठ्या प्रमाणात होता. तेव्हा २ हजार ६०० च्यावर रुग्ण आढळत होते. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात दुसऱ्या लाटेमुळे लोक हैराण झाले. अनेकांना जीव गमवावा लागला, तर अत्यवस्थ रुग्णांची बेडअभावी अक्षरश: ससेहोलपट झाली. रेमडेसिविर इंजेक्शन, औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे नातेवाईक हैराण झालेले पाहायला मिळाले. या तक्रारी तालुका पातळीवरील कंट्रोल रुममध्ये मोठ्या प्रमाणात येत होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर नळाला पाणी येत नसल्याच्याही तक्रारी या काळात जास्त प्रमाणात झाल्या.
औषधे मिळत नाहीत काय करू?
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर औषधांची गरज पडते. सरकारी दवाखान्यांमध्ये औषधे मिळतात. मात्र, खासगी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे अनेक दुकाने फिरूनदेखील मिळत नसल्याने औषध मिळत नाहीत काय करू, अशा प्रकारच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळत आहेत.
कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा चांगला नसेल तर त्याबाबत तहसीलदारांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी होतात. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा तक्रारी आल्यानंतर स्थानिक पातळीवरच तहसीलदारांनी कंत्राटदार बदलण्याच्या सूचना केल्या. नगर पालिका व ग्रामपंचायतींमध्ये नळाला पाणी येत नसल्याच्याही तक्रारी खूप आहेत.
बेड कुठे उपलब्ध होईल हो?
१. कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना जिल्ह्यात बेडची संख्या कमी होती. अनेक अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयांत बेड मिळणेही कठीण जात होते. तेव्हा बेडची विचारणा मोठ्या प्रमाणात होत असे.
२. आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. तसेच प्रशासनातर्फे बेडची संख्यादेखील वाढवली असल्याने अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळवताना पळापळ करावी लागत नाही. कंट्रोल रुमकडे विचारणा केल्यानंतर लगेच बेड उपलब्ध होतोय.
३. लसीकरण करून घेण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू आहे. पहिला डोस घेतलेल्या लोकांना मुदत संपूनदेखील दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत कंट्रोल रुमकडे जास्त विचारणा केली जात आहे.
कोट...
कंट्रोल रुमही २४ तास सेवा देत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मुख्यत: बेड उपलब्ध करून देण्यासाठी लोकांचे फोन येत होते. आता लसीकरण कुठे उपलब्ध आहे, याची लोक जास्त प्रमाणात विचारणा करत आहेत.
मोहित तोडकर
कंट्रोल रुम प्रमुख
कंट्रोल रुमकडे आलेल्या तक्रारी
बेड : ४५७
लसीकरण : १५,९८७
नळाला पाणी येत नाही : ४०५
जेवण चांगले नाही : ४०९
दुकाने कधी उघडणार : २०५६
नियम नक्की काय आहेत : ५०६