औंध : परिसरातील बहुतांशी ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या असून, काही ठिकाणी सत्ता अबाधित राहिल्या, तर काही ठिकाणी धक्के बसले आहेत, तर गेली अनेक वर्षे येळीव गावात माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड यांची एकहाती असणाऱ्या सत्तेला धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे.
पळशी ग्रामपंचायतीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी सत्ता राखली असून, आमदार गोरे गटाने एका जागेने चंचू प्रवेश केला आहे. नागाचे कुमठे येथे माजी सभापती संदीप मांडवे यांनी सत्ता राखली आहे, तर भोसरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीने सर्व जागा जिंकत यश मिळविले असून, आमदार गोरे गटाला एकही जागा मिळविता आली नाही. गोपूज येथे सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पाच सदस्य सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निवडून आले आहेत व यापूर्वी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. लोणी येथे सहा जागांवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने, तर एका जागेवर विरोधी गटाने विजय मिळवला. कोकराळे येथे शिवसेनेची सत्ता आली आहे, जायगाव येथेही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने बाजी मारली आहे. नांदोशी येथे परिवर्तन झाले असून, आमदार गोरे गटाला यश मिळाले आहे. त्यांचे चार, तर विरोधी गटाला तीन जागा मिळाल्या आहेत. खरशिंगे येथे जयभवानी परिवर्तन पॅनेलला घवघवीत यश मिळाले असून, त्यांच्या पाच, तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.
(चौकट)
सरपंचपदाच्या आरक्षणाकडे विरोधी गटांच्या नजरा...
परिसरात ज्यांना सत्तेपासून बाजूला रहावे लागत आहे, त्यांना आता आपल्या निवडून आलेल्या सदस्यांमध्येच सरपंच पदाचे आरक्षण पडावे, यासाठी त्यांच्या नजरा लागल्या आहेत. आमच्यातीलच सरपंच होणार, असे सत्ताधारी म्हणत आहेत, तर विरोधी गट त्याकडे आता डोळे लावून बसला आहे. त्यामुळे कमी सदस्य संख्या असणारे आता सरपंच सोडतीकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत.