सातारा : जिल्हा पोलिस दलात घेण्यात येत असलेल्या पोलिस भरतीसाठी इंजिनिअर, बी. एस्सी. बी. एड., डी. एड., बी. काॅम. असे उच्च शिक्षण झालेले उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पोलिस शिपाई होण्यासाठी फक्त १२वी पासची अट असली तरी सर्वाधिक उच्च शिक्षित तरुणच खाकी वर्दी घालण्यासाठी जिवाचे रान करत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा पोलिस दलात २३५ जागांसाठी तब्बल १३ हजार अर्ज आले आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या नियंत्रणात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यंदा पारदर्शक प्रक्रियेसाठी उमेदवारांची नोंदणी बायोमेट्रिक स्कॅनने होणार आहे. प्रणालीने उमेदवारांना चेस्ट क्रमांकावर बारकोड दिला जाणार असून, त्यावरून त्यांची १००, १,६०० मीटर धावण्याचा अचूक वेळ नोंदवून गुणांकन केले जाणार आहे. या पोलिस भरतीवेळी तांत्रिक बाबीचा वापर झाल्याने पोलिसांचे मनष्यबळही कमी लागणार आहे. उच्च शिक्षित तरुण पोलिसात भरती होत असल्याने जिल्हा पोलिस दलाचा दर्जाही सुधारणार आहे.
पदे २३५, अर्ज १३ हजारसातारा जिल्हा पोलिस दलात २३५ रिक्त जागांसाठी तब्बल १३ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून या भरतीला उमेदवार हजर झाले आहेत. खाकी वर्दीची क्रेझ तरुणांमध्ये दिसून येत असून, पोलिस भरती होण्यासाठी अनेक दिवसांपासून हे तरुण सराव करत होते.