सातारा : पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अनोळखी मृत व्यक्तींच्या छायाचित्र प्रदर्शनात सातारा जिल्ह्यातील सुमारे ३५८ छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत. विशेष म्हणजे, यात वयस्कर आणि भूकबळी महिलांचे प्रमाण अधिक आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी पुरंदर येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. कुटुंबातील हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी उपयुक्त असल्याने हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात यंदा सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नवी मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद आदी मुख्य शहरातून अनोळखी मृत व्यक्तींची सुमारे दोन हजार छायाचित्रे लावण्यात आली आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेकडो लोक या ठिकाणी भेटी देत असतात. विविध ठिकाणचे लोक या प्रदर्शनातून त्यांच्या हरवलेल्या नातेवाइकांना शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रदर्शनात मांडलेल्या दोन हजार छायाचित्रांमध्ये सातारा जिल्ह्यातून गेलेल्या ३५८ अनोळखी मृत व्यक्ती, महिलांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) महिलांचे प्रमाण अधिक का?घरात मुलीचा जन्म झाल्यापासूनच तिच्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. जन्मल्यानंतर आई, थोडी मोठी झाल्यानंतर दादा, त्यानंतर पती आणि पती निधनानंतर तिचा मुलगा! हे चक्र गेल्या अनेक वर्षांपासून चालत आल्याने आपले निर्णय स्वत: घेऊन धाडसाने एकटे राहून दाखवणारी महिला अभावानेच एखादी. घरात होणाऱ्या किरकोळ वादावरूनही महिला स्वत:ला संपविण्याचा विचार करते. मुलींच्या विवाहानंतर जावयाच्या दारात जाणार नाही, ही भीष्मप्रतिज्ञा एकीकडे असते तर मुलाच्या वाढत जाणाऱ्या संसारात आता आपण ‘अडगळ’ झालोय, ही भावना दुसरीकडे असते. या द्वंद्वात महिलेचे मानसिक संतुलन बिघडू लागते. आयुष्यभर समजून घेणारा पती नसेल तर तिची अत्यंत विचित्र अवस्था होते आणि मग विरक्ती पत्करून ती बाहेर पडते; पण समाजाच्या या झळा ती सोसू शकत नाही, म्हणूनच अनोळखी मृत व्यक्तींमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते, असे तज्ज्ञांचे मत आहे..मद्यपानाची सवय असणाऱ्या पुरुषांना त्याविषयी घरातून सारखी टोचणी मिळाली तर खिशात पैसे घेऊन हे पुरूष घर सोडतात. गाडी मिळेल तिथे जायचे आणि मिळेल ती प्यायची. मद्यपानाची सवय जडल्यामुळे शारीरिक व्याधीही वाढत असतात. त्यामुळे अनेकदा परराज्यातून आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढीव असते. काहीदा वातावरणातील बदल आणि शरीरात मद्याचे अतिरिक्त प्रमाण असल्याने हे पुरुष मृत होतात. परराज्यातील असतील तर त्यांच्या कुटुंबीयांना इथंपर्यंत पोहोचता येत नाही.गारठ्याने किंवा पावसाने घर नसणारे किंवा घर सोडून आलेल्या महिला किंवा पुरुषांचा गारठून मृत्यू होतो. घर सोडून आल्यामुळे व त्यांची ओळख न पटल्यामुळे हे मृतदेह बेवारस म्हणून सरकारी दप्तरी नोंदविले जातात.
‘अनोळखी मृत्यू’मध्ये सर्वाधिक महिला !
By admin | Published: May 05, 2016 11:38 PM