उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी (ता. कऱ्हाड) येथील सेवारस्त्यावर मद्यधुंद अवस्थेतील क्रेनचालकाने दोन वाहनांना धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार झाल्या तर त्यांची एक मुलगी गंभीर जखमी झाली. यामुळे संतप्त झालेल्या कोर्टी ग्रामस्थांनी महामार्गासह उपमार्गाची वाहतूक सुमारे एक तास रोखून धरली. हा अपघात रविवारी रात्री आठ वाजता झाला.रुक्मिणी परदेशी (वय ३५), गायत्री परदेशी (१८, रा. कऱ्हाड), अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकीची नावे आहेत. तर आर्या परदेशी (१३), असे जखमी मुलीचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा ते कऱ्हाड बाजूकडे जाणाऱ्या कोर्टी गावच्या सेवारस्त्यावर क्रेनचालकाने मद्यधुंद अवस्थेत वेडेवाकडे वाहन चालवले. यावेळी सुरुवातीला त्याने एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर समोर चाललेल्या दुचाकीला (एमएच ०४ सीक्यू ७९४६) धडक देऊन त्यांच्या अंगावरून क्रेन नेली. यात मायलेकी जागीच ठार झाल्या. तर लहान मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, सेवारस्त्याचा कठडा अक्षरश: तुटला. अपघातानंतर क्रेन घेऊन चालकाने पलायन केले. परंतु ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.रुक्मिणी परदेशी या दोन मुलींसह तारळे, ता. पाटण येथे नातेवाइकांकडे गेल्या होत्या. त्या कऱ्हाड येथे जात असताना हा अपघात झाला. उंब्रज पोलिस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
Satara: क्रेनच्या धडकेत दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार, ग्रामस्थांनी चालकाला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:08 PM