कऱ्हाड : राष्ट्रीय महामार्गालगतयेथील वारुंजी फाट्यानजीक शनिवारी पहाटे झुडपात बेवारस स्थितीत सापडलेल्या तान्हुलीवर उपजिल्हा रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात एक महिला स्वत:हून हजर झाली असून, तिने आपण त्या तान्हुलीची आई असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्या महिलेकडे याबाबतचा ठोस पुरावा उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांनी तान्हुलीला तिच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. वारुंजीफाटा येथील उपमार्गानजीक वैशाली मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस झुडपामध्ये शनिवारी पहाटे एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. हा आवाज व्यायमासाठी परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ऐकला. नागरिकांनी याबाबत शहर पोलिसांत महिती दिली. त्यानंतर पोलीस त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी पाहणी केली असता झुडपात दहा दिवसांची तान्हुली कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडली. पोलिसांनी जीपमधून तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला कृष्णा रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागात दाखल करण्यात आले आहे. तान्हुलीची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात एक महिला स्वत:हून हजर झाली असून, ही तान्हुली तिचे आपत्य असल्याचा दावा तिने पोलिसांत केला आहे. मात्र, याला कायदेशीर आधार नसल्याने पोलिसांनी तान्हुलीचा ताबा अद्याप तिच्याकडे दिला नाही. संबंधित महिलाच त्या बाळाची माता असल्याची खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय तपसणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बेवारस ‘तान्हुली’ची आई प्रकटली !
By admin | Published: March 01, 2015 11:02 PM