सातारा : घरात असलेले लहान बाळ औषध पित नसल्याच्या कारणावरून विवाहितेला मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार आसगाव (ता. सातारा) येथे घडला. या प्रकरणी सुनीता सचिन कांबळे (रा. आसगाव, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सचिन भगवान कांबळे, सासू नंदा भगवान कांबळे, सासरे भगवान शिवराम कांबळे, शैलेश भगवान कांबळे (सर्व रा. आसगाव, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार विवाहिता सुनीता या २ रोजी त्यांच्या लहान बाळाला औषध पाजत होत्या. मात्र, ते बाळ औषध पित नसल्याच्या रागातून पती सचिन याने त्याच्या हातातील कडे सुनीता यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. घडला प्रकार त्यांनी इतर संशयितांना सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सर्वांनी संगनमत करून सुनीता यांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, सुनीता यांची आई व मावशी यांनी सर्व संशयितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावीची भाषा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.