लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीमुळे अजूनही बऱ्याचशा शाळा बंद आहेत. काही पालकांच्या संमतीनंतरच जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला असला, तरी ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली आहे, त्या मुलांच्या आईच्या चिंतेत भर पडली आहे.
ज्या गावांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, त्या गावांत आठवीपासूनचे वर्ग भरविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत नुकताच सर्व्हे करण्यात आला. संबंधित गावांमध्ये एक महिना कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.
ग्रामीण भागात शिकवणी वर्गावर खर्च करणेही अनेकांना परवडत नाही. यामुळे आपण मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलांच्या भवितव्याचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांनी त्यांच्या मुला-मुलींना शाळेत पाठविण्यास तयारी दर्शविली आहे. आपल्या पाल्यांना शिकविणारा शिक्षक शहरातून येजा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लागून राहणार, असे विचार पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चौकट :
शाळेत पाठविताना ही काळजी घ्याच
शाळेत गेल्यानंतर एका बाकावर एकच विद्यार्थ्याने बसावे.
सुट्टीत डबा खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
सुरक्षित अंतर पाळावे आणि मास्क वापरावा.
घरी गेल्यावर मास्क, कपडे गरम पाण्यात धुवावेत.
मुलांना स्वच्छ आंघोळ करावी.
मुलाला सर्दी, खोकला असेल तर शाळा टाळावी.
पॉइंटर :
जिल्ह्यातील एकूण शाळा : ८३०
सुरू झालेल्या शाळा : ००
शाळा सुरू करण्यासाठी अनुकूल : ५२
शाळांकडून प्राप्त माहिती : ४७०
आठवी ते बारावी विद्यार्थ्यांची संख्या : २,०३,५०६
कोट :
कोरोना परिस्थितीमुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता माझा मुलगा दहावीत गेलाय. त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या वळणावर त्याचे शिक्षण होऊ शकले नाही. ऑनलाइन अभ्यास समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न असला, तरीही वर्गातल्या शिक्षणाला सर नाही, पण तरीही कोरोनाची मनात भीतीही आहे.
- अर्चना देशमुख, संभाजीनगर
मुलांच्या शाळा सुरू झाल्या, तरी पहिल्यासारखे निश्चिंत राहता येत नाही. आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. माझी मुलगी आठवीच्या वर्गात आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असले, तरीही त्यात समजण्याचा गोंधळ होतोय. शाळेत जाताना तिने कोणती काळजी घ्यावी, याची माहिती तिला वारंवार द्यावी लागणार आहे, घरी आल्यावरही आंघोळ करण्याची सवय तिला लावावी लागेल.
- आस्मा पटेल, आई, विलासपूर.