लोणंद : मुलाला शॉक लागल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा शॉग लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालुक्यातील सुखेडमधील पडळकर वस्तीवर रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.दिपाली संतोष पडळकर (वय ३२) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या दुर्देवी मातेचे नाव आहे. हा प्रकार वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे झाला असल्याचा आरोप पडळकर कुटुंबीयांनी केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पडळकर यांच्या घरातील वीजेची जोडणी वायरमनने या घटनेच्या काही तासांपूर्वी केली होती. परंतु तरीही संपूर्ण इमारतीस शॉक बसत होता. दिपाली व त्यांचा मुलगा दुपारच्या सुमारास टेरेसवर गेले होते. त्यावेळी खेळताना मुलगा शुभमला अचानक शॉक लागला.
हा प्रकार दिपाली यांच्या लक्षात येताच त्यांनी शुभमला सोडविले. मात्र, त्यांना जोरदार विजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील वीज कनेक्शन चुकीचे जोडल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप बाळकृष्ण पडळकर यांनी केला आहे. या घटनेची लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे.गुन्हा दाखल करण्याची मागणी..या भागात सतत कमी दाबाने वीज पुरवठा होतो. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही या ठिकाणी नवीन डीपी बसविण्यात येत नाही. दिपालीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.