लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : ‘हिरवा निसर्ग हा संगतीने, जीवन सफर करा गमतीने’ या काव्यपंक्ती वास्तवात उतरविण्यासाठी अलीकडे पर्यटकांचा कल नैसर्गिक ठिकाणांकडे वाढला आहे. हिरव्यागार निसर्गाची मौज लुटण्यासाठी पावसाळा सुरू झाला की डोंगरमाथ्यावरील ठिकाणे, दऱ्याखोऱ्यातील छोटे-मोठे धबधबे हे पर्यटनाचे केंद्रबिंदू होऊ लागले आहेत. त्यामुळे या नव्या स्थळांचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढताना दिसत आहे.
पावसाळा सुरु झाला की निसर्गात रंगांची मुक्त उधळण पाहायला मिळते. आजूबाजूच्या डोंगररांगा हिरवाई नटून जातात. डोंगराच्या उंच कड्यावरून पावसाचे पाणी धबधब्याच्या रूपाने फेसाळत कोसळताना दिसू लागते. हा सर्वच निसर्गरम्य देखावा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी कौटुंबिक सहलींसह मित्र-मैत्रिणींचा कल अशा ठिकाणांकडे वाढताना पाहायला मिळत आहे.
पर्यटन ही हल्ली हौस बनू लागली आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे धार्मिक आणि पौराणिक स्थळांकडे न जाता नैसर्गिक ठिकाणांकडे ओढा अधिक वाढत आहे. त्यातच प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी असल्याने निसर्गातील उंच डोंगर, घनदाट जंगलातील वाटा, फेसाळणारे धबधबे, ऐतिहासिक गड किल्ले, नदीकाठचे प्रदेश, अथांग समुद्रकिनारा याची प्राधान्याने निवड केली जाते.
(चौकट..)
कुटुंबासह पर्यटनस्थळी गर्दी
कोरोनामुळे पडलेल्या लॉकडाऊनमध्ये सध्या शिथिलता दिल्याने गेल्या दीड वर्षात घराबाहेर पडू न शकलेली पर्यटनप्रेमी मोठ्या उत्साहाने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह, मित्रांसह पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. घरात कोंदटलेल्या वातावरणात आणि शहरातील कोरोनाच्या भीतीचे वातावरणापासून दोन दिवस निसर्गाच्या सान्निध्यात जाणे अधिक सोयीस्कर मानले जात आहे. त्यामुळे अशा पर्यटनस्थळी गर्दी वाढताना दिसत आहे .॥
(चौकट)
नैसर्गिक ठिकाणांकडे अधिक आकर्षण..!
सातारा जिल्ह्यात खंडाळ्याची हरेश्वर डोंगररांग, वाईच्या पश्चिम भागातील जोर, जांभळी खोरे, रायरेश्वर, कोळेकर पठार, महाबळेश्वरची सह्याद्री पर्वतरांग, जावळीचे निर्भीड अरण्य, मेरुलिंग, सूळपाणी डोंगर, साताराचे परळी, यवतेश्वर खोरे, जरंडेश्वरचा डोंगर, कास पठार, पाटणमधील कोयना, मोरगिरी खोरे, सडावाघापूर, वाल्मीकी पठार या भागातील नैसर्गिक ठिकाणांकडे अधिक आकर्षण आहे.
(कोट..)
भटकंती हा माणसाचा सहजभाव आहे. नैसर्गिक ठिकाणी झाडाझुडपांच्या आणि पशुपक्ष्यांच्या सहवासात दोन दिवस घालवल्यामुळे मन प्रसन्न होते. पुढील कामासाठी चैतन्य निर्माण होते. त्याचबरोबर डोंगरवाटा चालत राहिल्याने आरोग्य अधिक चांगले राहते. यासाठी धार्मिक स्थळांपेक्षा डोंगरातील नवीन ठिकाणे नेहमी आकर्षित करतात. आम्ही त्याची मौज घेत असतो.
-मिलिंद बच्चेवार, अधीक्षक अभियंता, पर्यटक
........................................
२७खंडाळा
निसर्गरम्य देखावा डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी कौटुंबिक सहलींसह मित्र-मैत्रिणींचा कल अशा ठिकाणांकडे वाढताना पाहायला मिळत आहे.