सातारा : वणव्यांमध्ये वनसंपदा जळून खाक होत असून, पशु-पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.
जिल्ह्याला सह्याद्री डोंगररांगांचे काेंदण लाभले आहे. परंतु सध्या वणव्यांमुळे या डोंगररांगा होरपळल्या जात आहेत. जंगली पशूंचे अधिवास नष्ट झाल्याने हे प्राणी सैरभैर झाले आहेत. निवाऱ्याबरोबरच त्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे भरकटलेले प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांच्या वावरामुळे नागरिक मात्र धास्तावले आहेत. या प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, जे कोणी वणवे लावत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तरच हे वणवे थांबतील. अन्यथा शहराच्या आजुबाजूची आणि ग्रामीण भागातील शिल्लक राहिलेली जंगलेही नष्ट होतील, अशीही भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.