मणदुरे : कोयना व चांदोली अभयारण्यांचा बफर झोन रद्द करून खासगी क्षेत्रावरील बंधने हटवण्याकरिता २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर कोयना नदीकाठावर आंदोलन व नंतर जलसमर्पण करणार असल्याचे निवेदन पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार व ९६ गावांच्या सरपंचांनी पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले आहे. कोयना व चांदोली अभयारण्याचा बफर झोन रद्द करावा, खासगी जमिनीवरील बफर झोन न लावता, वनविभागाच्या जमिनीवर लावावा, जंगली जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी, कोयना जलाशयात मासेमारी परवानगी मिळावी, स्थानिक जनतेला मासेमारी करण्यासाठी धरण भिंतीचे संरक्षण क्षेत्र सोडून लाँचला परवानगी मिळावी, तसेच त्याचे परवाने तहसीलदारांच्या हस्ताक्षरात मिळावेत, शेती संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने मिळावेत, जुन्या परवान्यांचे नूतनीकरण वारसा हक्काने मिळावे, जिल्हा परिषदेची सर्व्हिस लाँच सुरू करावी, अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन होईपर्यंत सर्व नागरी सुविधा मिळाव्यात, शेतातील झाडे तोडण्यास परवानगी मिळावी, कोयना धरणाच्या पाण्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा व शिल्लक राहिलेल्या जमिनी आम्हाला वापरण्यास मिळाव्या, या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मशाल मिरवणूक, त्यानंतर नदीकाठी जाऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही निर्णय न झाल्यास ६ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांतील महिला व मुलांसह कोयनेत जलसमर्पण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यासह अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
‘बफर झोन’ रद्द करण्यासाठी आंदोलन!
By admin | Published: October 21, 2015 9:46 PM