मायणी : येरळवाडी, ता. खटाव येथील तलावामध्ये गेली ३० ते ३५ वर्षे मायणी येथील यशवंत मच्छिमार संस्थेतर्फे मच्छिमारीचा व्यवसाय केला जात होता. यावर्षी या संस्थेला विश्वासात न घेता परस्पर ठेका दुसऱ्या संस्थेस दिल्यामुळे येथील ४० ते ५० कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास याच तलावात आम्ही जलसमाधी घेऊ, असा इशारा या संस्थेमार्फत देण्यात आला आहे. येथील यशवंत मच्छिमार संस्था १९८२ पासून रजिस्टर आहे. तेव्हापासून या संस्थेमार्फत येरळवाडी तलावातील मच्छिमारीचा ठेका घेतला जातो. तसेच पावसाळ्यानंतर तलावामध्ये पाणी आल्यानंतर ही संस्था पाठपुरावा करून मच्छबीज सोडण्यास शासनाला भाग पाडत असते. त्यानंतर याच तलावातील मासेमारीवर मायणी भागातील ४० ते ५० कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत असतात.मात्र, यावर्षी शासनाने या संस्थेला विश्वासात न घेता दुसऱ्या संस्थेस हा मच्छिमारीचा ठेका दिला असल्याचा आरोप या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. हा ठेका शासनाने रद्द करावा किंवा नव्याने निविदनाकडून आमचाही समावेश करावा, गेल्या ३० ते २५ वर्षांपासून आमचा उदरनिर्वाह याच तलावावर चालत असून हा तलाव मच्छिमारीसाठी असल्याने त्वरित द्यावा अन्यथा या तलावामध्ये आम्ही सहकुटुंब जलसमाधी घेऊ.यावेळी यशवंत मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, हणमंत साळुंखे, तानाजी साळुंखे, मच्छिंद्र साळुंखे, सुखदेव साळुंखे, आयुब शेख, कादर शेख, किसन सूर्यवंशी, किसन साळुंखे, नंदकुमार मोरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) उपासमारीची वेळगेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आम्ही या तलावात मच्छिमारी करीत असून, यावर्षी शासनाने आम्हाला विश्वासात न घेता हा ठेका दुसऱ्याला दिल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. - दिलीप सूर्यवंशी, अध्यक्ष, यशवंत मच्छिमार संस्था, मायणी
पाण्यात उतरून मच्छिमारांचे आंदोलन
By admin | Published: June 12, 2015 11:35 PM