पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळून जिंतीसह इतर गावांत पावसाचे पाणी शिरले. वीजपुरवठा खंडित झाला. पहाटे पाच वाजता सुमारे दोनशे कुटुंबे असलेल्या या गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ संकटात सापडले. स्थानिक पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवून मदतकार्य सुरू केले. मात्र, पावसाने ओढ्यावरील पूल वाहून गेला. मनसेचे तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, विभाग अध्यक्ष दीपक मुळगावकर यांच्यासोबत माथाडी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विलास घोणे, चिटणीस चंद्रशेखर मढवी यांनी या भागाचा पाहणी दौरा केला असता प्रशासनाकडून व राज्य सरकारकडून या बाधितांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचे निदर्शनास आले. बाधित सर्व कुटुंबे मंगल कार्यालयात व जिल्हा परिषद शाळेत निवारा घेत आहेत. त्यांची जनावरे गावात अडकली आहेत. मात्र, या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित पूरबाधित गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे. त्यासाठी सरकारने जागा देऊन घरे बांधून द्यावीत. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आहे. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या वेळी दीपक रेटरे, प्रकाश करपे, जगन्नाथ आबुळकर, सत्यवान गायकवाड, विनायक जाधव, शुभम पाटील, संकेत निवडुंगे, सुरेश सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.