आॅनलाईन लोकमतम्हसवड (जि. सातारा), दि. १९ : माण तालुक्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माणगंगा नदीत सोडण्यात यावे, अन्यथा माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलन उभारणार, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ यांनी दिला.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरची सुविधा ही तत्काळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून गोंदवले मार्गे माणगंगा नदीमध्ये सोडल्यास सिमेंट बंधारे भरले जातील आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तरी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न झाल्यास माण तालुक्यातील नागरिकांसमवेत जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दुष्काळी भागातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून संबंधित विभागाला तत्काळ उरमोडीचे पाणी सोडण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. भारती पोळ यांनी दिली.निवेदन देताना माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, योगेश पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माणला उरमोडीचे पाणी न सोडल्यास आंदोलन : भारती पोळ
By admin | Published: April 19, 2017 2:31 PM