सातारा : असुविधांच्या गर्तेत असलेल्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’च्या हद्दीबाहेर हलवावा, या मागणीसाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्यावतीने रविवार, दि. १६ रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबरोबरच अनुचित प्रकार घडू नये म्हणून समितीतील तब्बल ४८ जणांना तडीपारीच्या नोटीसही प्रशासनाने बजावल्या आहेत.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेला खेड-शिवापूर टोलनाका गेल्या काही वर्षांपासून गैरसोयींच्या बाबतीत चर्चेत राहिला आहे. रस्ता वापराचा टोल घेतल्यानंतरही प्रचंड मोठ्या प्रमाणावर मूलभूत सोयींची वानवा हा कायमच कळीचा मुद्दा राहिला आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांनी या टोलनाक्याला तीव्र विरोध केला. भोर, वेल्हा, हवेली, पुरंदर या ठिकाणच्या धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे येथे जाणाºया पुणेकरांची संख्या मोठी आहे. मात्र, केवळ त्यांच्या वाहनांकडून टोल वसूल करण्यासाठीच शिवापूरला हा टोलनाका ठेवण्यात आल्याचा आरोपही स्थांनिकाकडून करण्यात आला आहे.
रविवारी होणा-या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, आ. संग्राम थोपटे यांच्यासह समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक, स्थानिक व परिसरातील स्थानिकही उपस्थित राहणार आहेत.
असा आहे वाहतुकीतील बदलपुणे खेड शिवापूर, ता. हवेली (पुणे) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील खेड शिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून रविवारी (दि. १६) खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होऊ नये, याकरिता कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.साताºयाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिनियम कलम ३३ (१) (ब) नुसार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खालील मार्गाने वळविण्यात आली आहेत. सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहीर वाठार मार्गे लोणंद-नीरा-जेजुरीमार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-नीरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे-जोशी विहीर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहीर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या संवेधानिक अधिकारात आम्ही धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात आक्रमकता येऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आंदोलनस्थळाकडे जाणारी वाहने अडविण्याचे काहीच कारण नाही. प्रशासनाला पुरेसा अवधी देऊन मगच हे आंदोलन आम्ही करत आहोत. स्थानिकांच्या प्रश्नासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे निश्चितच गैर नाही.- संग्राम थोपटे, आमदार,