सातारा : नगरपालिका शेजारील कुंभारवाड्यात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वारंवार कळवून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज संतप्त नागरिकांनी सकाळी राजपथावर रास्ता रोको केला. परंतु सध्या बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लगेचच हे आंदोलन मागेहीे घेण्यात आले.पालिका व जीवन प्राधिकरणामार्फत नवीन वाढीव पाणी योजनेद्वारे शहरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. शहरातील बहुतांशी भागात ही योजना सुरू झाली आहे. तर काही भागात अजूनही काम सुरू आहे. त्यामुळे पालिकेने जुन्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद केला आहे. येथील कुंभारवाड्यातही नव्याने पाईपलाइन टाकली आहे; परंतु या पाईपला आजअखेर पाणी आलेले नाही व जुनी जलवाहिनीचे पाणीही बंद झाल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईसामोरे जावे लागत आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून या परिसरात पाणीपुरवठा झाला नाही म्हणून आज (गुरुवारी) सकाळी नऊच्या सुमारास नागरिकांनी हंडा, कळशी घेऊन राजपथावर रास्ता रोको केला. जवळपास अर्धा तास रास्ता रोको झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढली. सध्या सुरू असलेल्या बारावी परीक्षेमुळे हे आंदोलन करू नये, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते म्हणून तुम्ही पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती पोलिसांनी केली. यानंतर आंदोलकांनी केवळ बारावीच्या परीक्षेमुळे आंदोलन मागे घेतले. जवळपास अर्धा तास हा रास्ता रोको करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
बारावीच्या परीक्षेमुळे आंदोलन माग
By admin | Published: February 26, 2015 9:36 PM