ढेबेवाडी : प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा निषेध करत वांग मराठवाडी धरणस्थळी विस्थापित धरणग्रस्तांनी आज, सोमवारी आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत अन्याय कराल तर सत्तेतून खाली खेचू असा इशारा देत धरणग्रस्तांनी पाण्यात उतरून शपथ घेतली.अठ्ठावीस वर्षांपासून वांग नदीवर मराठवाडी नजीक धरणाचे काम चालू आहे. या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बहुतेक गावांचे पुनर्वसन झाले असले तरी प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित सुविधा अजूनही शासनाकडून पुरविण्यात आल्या नाहीत. त्यातच नव्याने काही अन्यायकारक आणि प्रकल्पग्रस्तांचे आयुष्यच उद्ध्वस्त करणारे निर्णय शासनाने घेतले आहेत. त्याबाबत पुनर्विचार करुन ते निर्णय तात्काळ थांबवावे यासाठी मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेण्याची मागणी धरणग्रस्त संघटनेने केली होती. त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात मराठवाडीचे धरणग्रस्त आक्रमक होत त्यांचा निषेध करत घोषणाही दिल्या.श्रमिक मुक्ती दलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः धरणग्रस्त आहेत तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींची पूर्ण जाणीव आहे. मात्र राज्यात चाललेल्या सरकारमधील चढउतारामुळे यांना आपल्याच धरणग्रस्त भावंडांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.हरितक्रांतीसाठी आम्ही सर्व बाबींचा त्याग करून विस्थापित झालो. तरीसुद्धा शासनाला या बाबीचे गांभीर्य नसल्याने आमच्यावरती २८ वर्षे अन्याय चालू आहे. मात्र हा अन्याय धरणग्रस्त कधीही सहन करणार नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल आणि त्यांच्यावर अन्याय कराल तर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देत धरणग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी या पुढचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार केला.पाण्यात उतरून घेतली शपथधरणग्रस्त स्त्री पुरुषांनी धरणाच्या पाण्यात उतरुन विकसनशील पुनवर्सन करण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी संघर्ष करण्याची शपथ घेतली. शासन आम्हीच आमच्यासाठी बनविली आहेत मात्र अन्याय करू लागली तर ती बदलण्याची ताकदही आमच्याकडे आहे. अशी शपथ घेतली. यावेळी सुरेश पाटील यांचेही भाषण झाले.
Satara: ..तर सत्तेतून खाली खेचू, धरणग्रस्तांचा सरकारला इशारा; वांग मराठवाडी धरणस्थळी पाण्यात उतरून घेतली शपथ
By दीपक शिंदे | Published: June 19, 2023 3:56 PM