सातारा : कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच प्रति माह एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबात मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासमवेत कर्मचारी संघाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. पालिकेकडून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळकाढूपणा केला जात आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रति माह एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, असे आदेश देण्यात आले आहे. मात्र, पालिकेने कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार रुपये दिले आहे. त्यामुळे थकीत प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, निवृत्त वेतन धारकांना सातवा वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा, धुलाई व शिलाई भत्त्यात प्रचलित दराने वाढ करावी, सेवाज्येष्ठता, वारसाहक्क व श्रमसाफल्य योजनेची अद्ययावत यादी प्रसिद्ध करावी, कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, वेळप्रसंगी कर्मचाऱ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यास औषधोपचारासाठी तातडीची मदत म्हणून २५ हजारांची तरतूद करावी अशा मागण्या कर्मचारी संघाकडून करण्यात आल्या. या मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, मार्चअखेर हे प्रश्न मार्गी न लागल्यास कर्मचारी संघाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. बैठकीला सागर गाडे, कोषाध्यक्ष रवी धडचिरे, संदीप कांबळे, कपिल मट्ट, बाबा गाडे, आदी उपस्थित होते.