रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे ३३ कोरोनाबाधितांवर घरातच उपचार केले जात आहेत. या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रांतून मोफत औषधपुरवठा केला जात आहे. दरम्यान, वाढत्या संसर्गामुळे बाधितांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मच्छीमार्केटच्या इमारतीत विलगीकरण कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
रहिमतपूरसह परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सध्या बाधित रुग्णांच्या वर घरीच औषधोपचार केला जात आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून मोफत औषधांचा पुरवठाही केला जात आहे. याबरोबरच रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह त्याच्या धामणेर, कठापूर, निगडी व सासुर्वे या चार उपकेंद्रातून बावीस हजार लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उपकेंद्रामध्ये आठवड्यातून एक दिवस व रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पंचेचाळीस वर्षांच्या पुढील लोकांना लस दिली जात आहे. याबरोबर इतर सर्व प्रकारच्या तपासण्याही गतीने सुरू असल्याची माहिती आरोग्य सहायक गंबरे यांनी दिली.
राज्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला असून, रहिमतपूरसह परिसरातील गावात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचे होणारे मृत्यू डोकेदुखी वाढवत आहेत. राज्य सरकारने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे, परंतु कोरोना संसर्ग आटोक्यात न आल्यास बाधितांची संख्या वाढणार आहे. या रुग्णावर घरीच औषधोपचार करण्यास अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतवर्षी ब्रह्मपुरी येथे उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाप्रमाणे यावेळी रहिमतपूर येथील मच्छी मार्केटच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याच्या दृष्टीने पालिकेकडून नियाेजन सुरू करण्यात आले आहे. नुकतीच तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालिकेचे अधिकारी व नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या बरोबर पाहणी केली आहे, तसेच रुग्णांच्या वर उपचार करण्यासाठी योग्य त्या सोईसुविधांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने पालिकेकडून नियाेजन सुरू करण्यात आले आहे.
कुटुंबीयांची काळजी घ्या
रहिमतपूरसह परिसरातील गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी शासकीय आदेशाचे पालन करून घरातून विनाकारण बाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, नागरिकांनी हात वारंवार साबणाने धुवावा, तोंडाला मास्क लावावा, घरातील वयोवृद्धांसह चिमुकल्यांची काळजी घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले.