सातारा : आघाडीतील राष्ट्रवादीकडून माढ्याचा उमेदवार ठरला नसलातरी ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांना बरोबर घेण्यासाठीच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. असे असतानाच आता तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याची विनंती पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे शरद पवार पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला होकार देणार की माण तालुक्यातील जानकर यांना ‘मान’ देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.माढालोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. सध्या या उमेदवारीवरुन महायुती अंतर्गतच नाराजीनाट्य सुरू आहे. त्यातच याला अनेक दिवस उलटून गेले तरीही त्यावर पडदा पडलेला नाही. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याबद्दलचा विरोध मावळण्याची शक्यताही कमीच आहे. तर अकलुजचे मोहिते-पाटीलही नाराज आहेत. भाजपने त्यांची नाराजी दूर न केल्यास ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही दंड थोपटू शकतात. या जर-तरच्या घडामोडीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही लक्ष असणार आहे. कारण, त्यांनाही माढा पुन्हा जिंकायचा आहे. यासाठी रणनिती आखत मतदारसंघाकडे त्यांचे लक्ष आहे. त्यातच माढा निवडणुकीला अजून खूप वेळ असल्याने घाईघाईने निर्णय घेण्याकडेही त्यांचा कल नाही. त्यामुळे धुरंदरपणे ते माढ्याकडे पाहत आहेत. महायुतीतील कोणी आपल्याकडे येणार का ? याविषयी ते चाचपणी करत असल्याची माहिती मिळत आहे. अशातच ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांचा पर्यायही त्यांनी समोर ठेवलेला आहे.जानकर यांच्याबरोबर त्यांच्या भेटीही झाल्या आहेत. पण, अंतिम आदेश अजून पवार यांनी दिलेला नाही. सकारात्मक बोलण्या पलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे पवार काय राजकीय खेळी करणार का ? हे लवकरच समोर येणार आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पवार यांच्याकडे माढ्याची निवडणूक ही तुतारी चिन्हावरच लढविण्याचा आग्रह धरल्याची नवीन माहिती समोर आली आहे. यासाठी पक्षात कोणाला सामावून घ्या, नाहीतर पक्षातीलच कोणालाही उमेदवार द्या, पण, पक्षचिन्ह निवडणुकीत राहू द्या असा घोषाच पदाधिकाऱ्यांनी लावून धरला आहे. त्यामुळे पवार काय निर्णय घेणार हे पाहणेही महत्वाचे ठरले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आता चिन्हावर लढावे..माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार आणि माणमधील दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील तीन विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे असेलतरी ते अजित पवार यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद कमी आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच पवार यांना ही खिंड लढवावी लागणार आहे. त्यातच सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून पक्ष चिन्हावर आता लढावे, अशी विनंती पवार यांना होत आहे. कारण, विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षचिन्ह मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच आताच्या निवडणुकीत चिन्ह राहिल्यास प्रचारालाही बळ मिळेल, अशी कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे आता शरद पवार हे काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर सकारात्मक चर्चाही झाली आहे. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत असून अजून त्याला अवकाश आहे. काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीबरोबरच रासपच्याही उमेदवाराची घोषणा होईल. - महादेव जानकर, माजी मंत्री व अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष