प्रमोद सुकरे -- कऱ्हाड पालिकेची पंचवार्षिक निवडणूक दि. २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातली आहे. सोमवार, दि. २४ पासून प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु आत्तापर्यंत ही निवडणूक आघाड्यांच्या माध्यमातून की पक्षीय पातळीवर लढविली जाणार? याबाबत संभ्रम कायम आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील या निवडणुकीत एकत्रित येणार की स्वतंत्रपणे लढणार? पक्षीय की आघाडीच्या माध्यमातून लढणार? भाजप सर्व जागा लढवणार की महायुती करणार? यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत असतानाच कऱ्हाड शहरात आणखी एका नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. या माध्यमातून दोन्ही आमदारांविना आघाडी करण्यासाठी काही आजी-माजी नगरसेवक प्रयत्न करत असून, गेल्या दोन दिवसांत याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिकेत सध्या राष्ट्रवादी काँगे्रस पुरस्कृत लोकशाही आघाडीची सत्ता आहे. त्याला यशवंतराव चव्हाण विकास आघाडीची मदत झाली आहे. आजमितीला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या नगरसेवकांच्यात आघाडीअंतर्गत एकवाक्यता दिसत नाही. काहींनी विधानसभा निवडणुकीवेळी हातात कमळ घेत सवतासुभा मांडला. तर कालपरवापर्यंत लोकशाहीचा कित्ता गिरवणारे दादा नरगसेवकही आता त्यांच्याबरोबर व्यासपीठावर दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत कोणकोणत्या आघाड्यांमध्ये सामना होणार की पक्षीय चिन्ह निवडणुकीत आणले जाणार, हे सांगता येत नाही.एमआयएम, मानवाधिकार पार्टी यांनी यापूर्वी पालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही त्यांच्या गोटात हव्या तशा हालचाली दिसत नाहीत. लोकशाहीने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी संवाद मेळावा घेतला खरा पण, त्यांना सूर गवसला नाही. शुक्रवारी त्यांनी पुन्हा एकदा संवाद साधण्याचे आव्हान केले आणि इच्छुकांनी मंगळवार पेठेत भाऊगर्दी केली. पृथ्वीराज चव्हाण संपर्क कार्यालयातही इच्छुकांची गर्दी पाहायला मिळतेय खरी! पण पृथ्वीराज चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील यांच्यातील छुपी मैत्री पालिका निवडणुकीत कायम राहणार का? याबाबत कोणीही नेमकेपणाने बोलायला तयार नाही.कऱ्हाड शहर दक्षिण विधानसभा मतदार संघात आल्याने उत्तरच्या आमदारांचा आता येथे तितकासा संबंध उरला नाही. तर दक्षिणच्या आमदारांना स्थानिक राजकारणात तितकासा रस नाही. असा समज काहींनी करून घेतला आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक असणाऱ्या एका दादांनी काही मातब्बर नगरसेवकांशी संपर्क चालविला आहे. आपण तिघे एकत्र आलो तर ‘जनशक्ती’ आपल्या बरोबर येईल आणि निवडणुकीत आपण ‘यशवंत’ होऊ आणि खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचा विचार आपण जोपासू, असे मत मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांच्या छायेखाली न जाता. ही निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला जात आहे.
आमदारांविना आघाडीसाठी हालचाली गतिमान -
By admin | Published: October 23, 2016 12:00 AM