आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त्यांनी लढवावी, पंतप्रधान व्हा; पण विकास करा वाटोळे करू नका,’ असे टीका विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता केली.आळजापूर येथे संतकृपा उद्योग समूह व आळजापूर ग्रामस्थ यांच्या वतीने रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, जिल्हा परिषद सदस्य दत्ता उर्फ धैर्यशील अनपट, मंगेश धुमाळ, सुभाषराव धुमाळ, डी. के. पवार, संतकृपा उद्योग समूहाचे प्रमुख व राष्ट्रवादी फलटण तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, भैरवनाथ उदयोग समूहाचे प्रमुख बाळासाहेब कासार, पंचायत समिती सदस्य प्रतिभा धुमाळ, विश्वासराव धुमाळ, अप्पासाहेब नलवडे, पोलीस पाटील शंकरराव पाटील, सरपंच अनिता मसुगडे उपस्थित होत्या.रामराजे म्हणाले, ‘तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनता सुखी व्हावी, म्हणून मी २५ वर्षे काम करीत आहे. गेल्या तीन वर्षांत शेती व दूध व्यवसाय मोडीत काढण्याचे काम सरकार करीत आहे. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आले; पण सर्वांनी उसाची लागण केली. त्याप्रमाणात साखर कारखाने वाढले. न्यू शुगर वर्क साखरवाडी कारखाना अडचणीत आला. तो बाहेर काढण्याचे काम करणार आहे. तालुक्यात शरयू, श्रीराम, न्यू फलटण कारखाने व त्याबरोबर उपळवे येथे कारखाना आहे; पण त्याला ऊस घातला तर पैसे मिळतात का, ते बघा विचार करून ऊस घाला.’समाजसेवक चंद्रकांत बोबडे, माजी सभापती शरद भोईटे, जितोबा भोईटे, सोसायटीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब नलवडे, मारुती कुंभार, मारुती खुडे, बाळासाहेब नलवडे, नीलेश नलवडे, चांदभाई पठाण, उदय निंबाळकर, विलासराव धुमाळ, अनिल भोईटे, विशाल झणझणे, शुभम नलवडे, राजाराम पवार, अंकुश नलवडे, महेंद्र्र धुमाळ, दीपक कदम, मारुती रणदिवे, जयवंत केजळे, दादा खताळ उपस्थित होते. विलासराव नलवडे यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच नितीन नलवडे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी आदर्की, आळजापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार, पंतप्रधान व्हा; पण वाटोळं करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:54 PM