कऱ्हाड : कोण बंदूक काढतयं. कोण ‘ओके, खोके’ घोषणा दिल्यावर तुम्हाला पाहिजे का? विचारतय. काय चाललय काय? राज्यातील सत्ता गेली त्याचं दु:ख नाही; पण या ईडी सरकारने राज्याची जी थट्टा चालवली आहे त्याने मन व्यथित होत आहे, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजीत पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, नंदकुमार बटाणे, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.सुप्रिया सुळे म्हणाल्या, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना या सरकारने स्थगिती दिली आहे. आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मग नेमकं चाललय तरी काय? शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना मदत मिळत नाही. त्यामुळे हे ईडी सरकार असंवेदनशिलच आहे, असे म्हणावे लागते.सर्व खासगी शाळांच्या शिक्षकांना सरकार पगार देईल. तुम्ही फी कमी करा, असे काही दिवसांपुर्वी राज्याचे शिक्षणमंत्री म्हणाले आहेत. याकडे लक्ष वेधले असता सुळे म्हणाल्या, त्यांचे शिक्षणाबाबतचे नेमके धोरण काय आहे, हे त्यांनी जाहीर करावे. ते जर सर्वांचे पगार देणार असतील तर आम्ही स्वत: त्यांचे अभिनंदन करु. तसेच नविन शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षणतज्ञांची टोकाची मते आहे. तर शिक्षण संस्था चालक अस्वस्थ असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.... पण राज्यातले आमदार कामाला लागलेत!सरकार किती दिवस टिकेल, याबाबत विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते देवाला माहीत. मात्र, राज्यातले सगळ्या पक्षाचे आमदार आपापल्या मतदार संघात कामाला लागले आहेत. यावरुन तुम्ही काय समजायचं ते समजा, असंही त्यांनी मुद्दाम सांगितले.
सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान
By प्रमोद सुकरे | Published: October 01, 2022 11:30 AM